

पिंपरखेड : ‘साहेब पैसे नको. या पैशाचं आम्ही काय करू.. आमचं बाळ आम्हाला परत द्या’ असे म्हणत शिवन्याच्या आई-वडिलांनी वन अधिकारी यांच्यासमोर हंबरडा फोडला.Latest Pune News)
पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्याच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून तत्काळ दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी उप वनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षकासह उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचे पहायला मिळाले.
पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनास्थळी जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच परिसर बिबटमुक्त होण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा केली.
ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी उप वनसंरक्षक यांच्याकडे केली. त्यावर या भागातील ग्रामपंचायतचे ठराव वरिष्ठ स्तरावर देऊन परिसर बिबटमुक्त करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उप वनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी दिले. तसा सूचनाही संबंधित अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना केल्या. या वेळी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्याची पाहणी केली.
पिंपरखेड घटनास्थळी एक बिबट जेरबंद झाला आहे. मात्र, हा परिसर बिबटमुक्त होत नाही, तोपर्यंत बिबट जेरबंद करण्याची कार्यवाही अशीच सुरू राहिल, असे निर्देश वाईल्ड लाईफ व क्षेत्रीय कर्मचारी यांना देण्यात आल्याचे जुन्नरचे उप वनसंरक्षक खाडे यांनी सांगितले. या वेळी पिंपरखेड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.