Daund Panchayat Samiti Reservation: दौंड पंचायत समितीची गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर; महिलांना मिळाली मोठी संधी
रामदास डोंबे
खोर : दौंड तालुका पंचायत समितीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत सोमवारी (दि. 13) जाहीर झाली. पंचायत समितीचे 4 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. सोमवारी गणनिहाय आरक्षण सोडत दौंड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये दौंडचे उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे व तहसीलदार अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.(Latest Pune News)
तालुक्यातील 14 गणांपैकी राहू, यवत आणि खामगाव हे गण इतर मागास प्रवर्ग (महिला) आरक्षणासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे या तीन गणांपैकी एकाच गणातून दौंड तालुका पंचायत समितीचा सभापती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी या तिन्ही गणांमध्ये आता राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणात उलथापालथ झाली आहे. अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून आपली राजकीय पायाभरणी सुरू केली होती. परंतु आता महिलांसाठी इतर मागास प्रवर्ग राखीव झाल्याने या प्रवर्गातील महिला उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहू, यवत आणि खामगाव या तिन्ही गणांवरूनच सभापती होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी राजकीय आडाखे मांडण्यास सुरुवात झाली आहे.
दौंड तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक नेहमीच चुरशीची राहिली आहे. तालुक्यातील विविध पक्ष, गट, संघटनांच्या रणनीती आता नव्याने आखल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीचे सभापतीपद कोणत्या गणातून आणि कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावावर जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर नेते, माजी सदस्य तसेच नव्या चेहऱ्यांमध्ये यामुळे हालचाली वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
इतर मागास प्रवर्ग (महिला) : राहू, खामगाव आणि यवत
सर्वसाधारण : पारगाव, वरवंड आणि कानगाव
सर्वसाधारण (महिला) : देऊळगाव राजे, बोरीपार्धी, कुरकुंभ, पाटस, केडगाव स्टेशन आणि बोरीभडक
खडकी : अनुसूचित जाती
अनुसूचित जाती (महिला) : गोपाळवाडी

