

बारामती : तरुणावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन सराइत आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून शिताफीने अटक केली. जयेश बाबासाहेब माने (वय 20), प्रथमेश बाळू गवळी (वय 20, दोघे रा. बऱ्हाणपूर, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Latest Pune News)
हा हल्ला जळोची येथील जय शंकर पानशॉपसमोर 9 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता घडला होता. त्यावेळी या आरोपींसह विनोद गणेश जाधव (रा. तांदूळवाडी, बारामती) व अन्य चार जण दुचाकीवरून तेथे आले होते. त्यांनी फिर्यादीस, तू गणेश वाघमोडे सोबत का फिरतोस? अशी धमकी देत प्रथमेश गवळी याने कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपींनी “आम्ही येथील भाई आहोत” असा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष तपास पथक तयार केले.
तांत्रिक माहिती व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयेश माने व प्रथमेश गवळी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीशी या गावात लपल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने शिताफीने छापा टाकून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. अन्य आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे यादव यांनी सांगितले.
या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम, बाळासाहेब कारंडे, एस. जे. वाघ, खारतोडे, स्वप्निल अहिवळे आणि होळंबे यांनी सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पवार अधिक तपास करत आहेत.
बारामती तालुका पोलिसांनी अटक केलेला जयेश माने हा गणेश धुळाबापू वाघमोडे खून प्रकरणातील आरोपी आहे. ऑगस्ट 2024 मध्ये शहरात हा खून झाला होता. त्या प्रकरणात जयेश हा तुरुंगात होता. दीड महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला आहे.