

मंचर : आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुके हे गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भयभीत झाले आहेत. यात अनेक निरपराध नागरिकांचा जीव गेला असनू रात्रीच्या वेळी शेतात काम करायला तर शेतकरी घाबरतात. या सर्व परिस्थितीत वनमंत्री गणेश नाईक यांनी अद्याप एकदाही बिबटप्रवण भागातील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतलेला नाही, अशी तीव नाराजी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.(Latest Pune News)
वनमंत्री गणेश नाईक यांनी आतापर्यंत ना जिल्हा किंवा तालुकास्तरावर अधिकारी बैठक घेतली, ना बिबट्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन व्यक्त केले. त्यामुळे शासनाकडून या भागाकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष अधिकच प्रकर्षाने जाणवते. शेतकरी संघटनांनी वनमंत्र्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घ्यावा, ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी मागणी केली आहे. सध्या गावोगावी बिबट्यांची भीती असून, रात्रीच्या वेळी लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळकरी मुले, शेतकरी, महिला या सर्वांना भीतीने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. अशा वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवा होता; मात्र आत्तापर्यंत कोणतीही कृती त्यांच्याकडून झालेली नाही हे वास्तव आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विभागाकडे पिंजरे अपुरे आहेत, ॲनिडर मशीन बसवण्याचे काम संथ आहे, तसेच वन कर्मचाऱ्यांकडे वाहनांसाठी डिझेलचा पुरवठा होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पातळीवर उपाययोजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे नागरिकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत झाला आहे. वनमंत्र्यांनी आता तरी परिस्थितीची गंभीर दखल घेऊन गावोगावी भेट द्यावी, असा सर्वसामान्यांचा आग्रह आहे.
आमच्यावर दररोज भीतीचे सावट आहे. एकामागून एक बिबट्यांचे हल्ले होत आहेत, पण मंत्री किंवा अधिकारी कोणीच विचारपूस करत नाहीत. आम्ही स्वतःचं रक्षण करण्यास समर्थ आहोत.
गणपतराव सावळेराम इंदोरे, शेतकरी, चांडोली
सरकारच्या आश्वासनांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. भीती, असुरक्षितता आणि असहाय्यतेने आम्ही जगतोय. अधिकारी फक्त बोलतात, पण आम्ही रोज जीव धोक्यात घालतो.
बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, शेतकरी, मंचर