पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2026 पर्यंत होती. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस 21 जानेवारीपासून ते 10 फेबुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएड या अभ्यासक्रमास आत्तापर्यंत 1 हजार 38 व एमएड या अभ्यासक्रमास 1 हजार 234 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 24 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर, याची फिल्ड परीक्षा 25 मार्च 2026 रोजी होणार आहे. एमएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 25 मार्च 2026 रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या mahacet.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील. मागील वर्षी या दोन प्रवेश परीक्षेमध्ये 6 हजार 193 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
नोंदणीसाठी अपार आयडी व यूडीआयडी बंधनकारक
यावर्षापासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी तसेच त्यांची पडताळणी करणे सहजशक्य व्हावे, यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी) बंधनकारक करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व यूडीआयडीची नोदणी करावी, यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजिलॉकरद्वारे तयार करावा. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.