पुणे: सध्या दूरचित्रवाणीवरील मराठी मालिका वेगळ्या धाटणीच्या विषयांनी गाजत आहेत. दिग्गज कलाकारांच्या जोडीला अनेक नवे चेहरेही मालिकांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या युवा कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
शहरातीलच नव्हे तर ग््राामीण भागातील युवा कलाकारही मालिकांमध्ये काम करत आहेत. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांमधील प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची संधी मिळत असल्याने कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. आम्हाला दूरचित्रवाणीवरील मालिकांनी खऱ्या अर्थाने व्यासपीठ दिल्याचे युवा कलाकार अभिमानाने सांगतात.
सोशल मीडिया, ओटीटी व्यासपीठामुळे दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकवर्ग कमी झाल्याचे सध्या बोलले जात आहे. पण, हा समज चुकीचा आहे. कारण आजही दूरचित्रवाणीची ताकद टिकून आहे आणि मालिकांचा प्रेक्षकवर्ग टिकून आहे. आता दूरचित्रवाणीचे क्षेत्र काळाप्रमाणे बदलले आहे, चॅनेल्सची संख्याही वाढली आहे. वेगळ्या धाटणीचे विषय आणि त्यात काम करणाऱ्या नव्या दमाच्या कलाकारांमुळे दूरचित्रवाणीवरील मराठी मालिकांना नवेपणा मिळाला आहे.
महिला सक्षमीकरण ते ऐतिहासिक विषयापर्यंतच्या मालिका सध्या सुरू आहेत. काहींनी मालिकांमधून करिअरची सुरुवात करण्यास प्राधान्य दिले आहे, तर काही जण चित्रपटांसह मालिकाही करीत आहेत. आम्हाला दूरचित्रवाणीमुळे ओळख मिळाल्याचे कलाकारांनी सांगितले. शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर) साजरा होणाऱ्या जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने कलाकारांशी संवाद साधत याविषयी जाणून घेतले.
दूरचित्रवाणी या माध्यमाचा प्रेक्षकवर्गही जास्त असल्याने प्रत्येक कलाकाराला वाटते की, आपण मालिकांमध्ये काम करावे आणि आज अनेक कलाकार मालिकांकडे वळलेही आहेत. मी चित्रपटाच्या माध्यमातून मालिकांकडे वळलो ते माझ्या आईमुळे. माझी आई ही मराठी मालिका पाहते. तिच्यामुळे मी मालिका करण्याचे ठरवले आणि एका मालिकेत मुख्य भूमिका साकारली. आजच्या मालिकांमध्ये नवेपणा, ताजेपणा आला आहे, नवे विषय हाताळले जात आहेत. अनेक तरुण कलाकार यात काम करत आहेत. दूरचित्रवाणी या माध्यमाने मला अभिनेता म्हणून ओळख दिली आहे.रोहित परशुराम, अभिनेते
दूरचित्रवाणीवरील एका मालिकेत मी भूमिका साकारली होती. पण, मालिकेसाठी कुठेही गेलो तरी आताही प्रेक्षकांकडून माझ्या अभिनायला भरभरून दाद मिळते, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चित्रपट आणि नाटकांमधून कलाकारांच्या अभिनयाला वाट मिळतेच. पण, मालिकांमुळे कलाकारांना खरी ओळख प्राप्त होते. शहरातीलच नव्हे तर ग््राामीण भागातील प्रेक्षक अभिनयाचे कौतुक करतात, तेव्हा खूप आनंद होतो. मालिकांसाठी कधी-कधी दिवसभर शूट करावे लागते, आमचे वेळापत्रक खूप बिझी असते. पण, तो कामाचा एक भाग आहे. परंतु मालिकांमध्ये काम करण्याचा आनंद वेगळाच असतो. आम्हा युवा कलाकारांसाठी दूरचित्रवाणी हे माध्यम खूप महत्त्वपूर्ण आहे.अतुल कुडले, अभिनेते.
दूरचित्रवाणीवरील चार मालिका आणि तीन रिॲलिटी शोजमध्ये मी काम केले आहे. मालिकांमुळे मला ओळख मिळाली आहे. दूरचित्रवाणी हे माध्यम आम्हा कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे आहे. मालिकांमध्ये काम करताना रोज कलाकारांना नवीन काहीतरी करण्याची संधी मिळते आणि काहीतरी नवीन शिकण्याची संधीही मिळते. दूरचित्रवाणीवरील मालिका माझ्यासाठी अभिनयाची कार्यशाळाच आहे. दूरचित्रवाणी हे माध्यम कलाकारांना पूर्णत्व देते, त्यांच्यातील कलाकाराला यातून मोकळी वाट मिळते. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये काम करत असल्याचा अभिमान वाटतो.मृण्मयी गोंधळेकर, अभिनेत्री