भोर: राज्याचे आराध्य दैवत मांढरदेव (ता. वाई) आणि कांजळे (ता. भोर) येथील श्री काळूबाई देवीची यात्रा 2, 3, 4 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मांढरदेवीला जाणाऱ्या वाहनांसाठी घाट रस्ता भोर मार्गावरून सुरक्षित करण्यात आला आहे. वाहन चालकांनी घाटात वाहने सावकाश चालवून भोर प्रशासनास सहकार्य करावे. तर गडावर पशु हत्या, वादन, वाजवण्यास बंदी राहणार असल्याचे भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले. भोर येथील प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. 24) कांजळे (ता. भोर) व मांढरदेवी (ता. वाई) येथील श्री काळूबाई यात्रेनिमित्त पूर्वतयारी नियोजन बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी डॉ. खरात बोलत होते.
या वेळी तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उदय तिडके, पोलिस निरीक्षक आण्णा पवार, उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे, पशुधन अधिकारी वर्षाराणी जाधव, नगर अभियंता समाधान खरात, बांधकाम उपअभियंता राजेशसाहेब आगळे, सहाय्यक अभियंता योगेश मेटेकर, प्रकाश जाधवर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, आगार निरीक्षक रमेश मंता, ग््राामसेवक अमोल गुत्ते, पोलिस पाटील शर्मिला खोपडे, दादासो भगत, सरपंच माधुरी खोपडे, उपसरपंच गीता उल्हाळकर, प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
भोर-कापुरव्होळ-मांढरदेवी-सुरूर फाट्यापर्यंत (वनविभाग वगळता) रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम पूर्ण झाले असून मांढरदेवी काळूबाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेसाठी भक्तांना ये-जा करण्यासाठी रस्ता सुरक्षित करण्यात आला असल्याचे सहाय्यक अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले. घाटातील वळणावर दिशादर्शक सुचना फलक लावण्यात आले आहे. या रस्त्यावर दोन क्रेन, पाण्याचे टँकर ठेवण्यात येणार आहे. भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी 59 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, तसेच उपजिल्हा रुग्णालयात 10 राखीव बेड, 4 रुग्णवाहिका असणार आहेत. या मार्गावर असणाऱ्या ग््राामपंचायतीच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य तपासणी कक्षाची सोय केली जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिडके यांनी सांगितले.
महसूल विभागाच्यावतीने 24 तास कंट्रोल रूम उभारण्यात यावे. भोर नगरपालिका हद्दीमधील अतिक्रमणे काढून वन विभागाच्या हद्दीतील खड्डे दुरुस्त करून घ्यावे, असे खरात यांनी आदेश दिले आहेत. आंबाडे ग््राामपंचायातीच्या वतीने भक्तांसाठी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत विपट यांनी सांगितले. अन्न पुरवठा प्रशासन विभागाच्यावतीने या मार्गावरील असणाऱ्या हॉटेलमधील अन्न-पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. भोर एसटी आगारातून जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी होऊन नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांनी सांगितले.
भोर मार्गावरून यात्राकाळात 70 टक्के भक्त मांढरदेव येथील काळूबाईच्या दर्शनासाठी जातात. यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये. भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी जाताना आपल्या वाहनाचा वेग सावकाश ठेवून देवीचे दर्शन घ्यावे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी करून सहकार्य करावे.डॉ. विकास खरात, उपविभागीय अधिकारी, भोर