

बावडा: बाजारात पेरूची आवक घटल्याने चालू महिन्यापासून पेरूच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सराटी (ता. इंदापूर) येथील कृषी पदवीधर पेरू उत्पादक शेतकरी अमर अशोकराव भोसले यांच्या पेरूला सध्या प्रतिकिलोस सरासरी 45 रुपये इतका चांगला भाव मिळत आहे.
अमर यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार पेरूची सध्या केरळ व हैदराबादच्या बाजारपेठेत विक्री सुरू आहे. त्यांनी दि. 26 फेबुवारी 2023 रोजी दोन एकर क्षेत्रावर ’तैवान पिंक’ वाणाच्या पेरूची लागवड केली होती. चालू वर्षी हे पीक दुसऱ्या वर्षात असून, आजअखेर सुमारे 9 टन पेरूचे उत्पादन निघाले आहे. पुढील काळात आणखी 5 ते 6 टन उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात पेरूचे बाजारभाव घसरले होते. मात्र, डिसेंबर महिन्यात दरात झालेल्या वाढीमुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतः कृषी पदवीधर असून, त्यांना बागेच्या व्यवस्थापनासाठी कृषी पदवीधर असलेले वडील अशोकराव भोसले, मातोश्री राजनंदा भोसले, पणन मंडळात वरिष्ठ अधिकारी असलेले बंधू अतुल भोसले तसेच कुटुंबीयांचे सहकार्य लाभत आहे. शेतीसोबतच ते केळी, ऊस, डाळिंब, नारळ, चिकू, आंबा तसेच भाजीपाला रोपवाटिकेच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही सेवा देत आहेत.