

महाळुंगे पडवळ: उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत मजूरटंचाईमुळे कांदा लागवड मोठ्या प्रमाणात रखडली आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी तब्बल 14 हजार रुपयांपर्यंत वाढीव मजुरी द्यावी लागत असून, त्यामुळे उत्पादनखर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
जुन्नर, आंबेगाव परिसरात दरवर्षी बीड, धाराशिव, भंडारदरा आदी भागांतून मजूर मोठ्या प्रमाणावर येत असत; मात्र मागील वर्षापासून या भागांतील मजूर येणे बंद झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना लागवडीची कामे करणे जिकिरीचे बनले आहे. गोहे बुद्रुक, कोळवाडी, आसाने, कुरवंडी आदी गावांतील महिला मजूर टेम्पो व तत्सम वाहनांद्वारे तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागात कांदा लागवडीसाठी दररोज येत आहेत.
कांदा लागवडीसाठी एकरी 12 ते 15 महिला मजूर लागतात. प्रत्येकी सुमारे एक हजार रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी लागत असून, एका दिवसात एक एकर क्षेत्रातील लागवड पूर्ण केली जाते. यंदा कांदा बियाण्यांचे दर प्रतिकिलो अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत होते. त्यातच पावसामुळे रोपे वेळेवर शेतात टाकता न आल्याने रोपे उशिरा तयार झाली. सर्व शेतकऱ्यांची रोपे एकाच वेळी लागवडीसाठी तयार झाल्याने मजूरटंचाई अधिक तीव झाली आहे. मंचर येथील कांदा अडतदार सागर थोरात म्हणाले की, शासनाचे कांदा निर्यात धोरण अद्याप स्पष्ट नसल्याने देशांतर्गत व राज्यातील कांदा बाजारपेठेचा अपेक्षित अंदाज बांधता येत नाही. कांदा उत्पादक शेतकरी व साकोरेचे सरपंच अनिल गाडे म्हणाले की, कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकरी मोठ्या आशेने लागवड करतो. मात्र, मागील वर्षी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यंदा कांद्याची निर्यात वाढल्यासच शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतील.
...तर हंगाम वाया जाईल
दरम्यान, कालवा समितीच्या बैठका न होणे व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने डिंभे डावा व उजवा कालव्यातून 15 डिसेंबरनंतरच पाणी सोडण्यात आले, अशी तक्रार किसान काँग््रेासचे अध्यक्ष बाळासाहेब इंदोरे यांनी केली आहे. खरीप हंगामासाठी आवर्तने वेळेवर न मिळाल्याने हंगाम वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. पाणी उशिरा मिळाल्याचा परिणाम कांदा लागवडीवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड कमी
आंबेगाव तालुक्यात सुमारे 4 हजार 400 हेक्टर, तर जुन्नर तालुक्यात सुमारे 6 हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड पूर्ण झाली असून, जानेवारी अखेरपर्यंत या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवड कमी असल्याचे चित्र आहे.