मंचर: सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाच स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखवून महिला व व्यावसायिकांची फसवणूक करणारी टोळी आंबेगाव तालुक्यात फिरत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भामट्यांच्या या टोळीचा पोलिसांनी शोध लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आठवड्यापूर्वी मंचर येथे एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दीड तोळे सोने भामट्याने बनवेगिरी करून लुबाडले होते. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे सात दिवसांपूर्वी एक तरुण सोन्याची खोटी चिप घेऊन एका हॉटेल व्यावसायिक महिलेकडे आला. ’50 हजार रुपयांत सोन्याची चिप देतो,’ असे सांगत त्याने महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेला संशय आल्याने तिने हे सोने सोनाराकडे तपासण्यासाठी नेऊ, असे सांगितले. हे ऐकताच संबंधित तरुणाने हॉटेलमधून पळ काढला. या प्रकारानंतर संबंधित महिलेने गावातील महिलांना सतर्क करीत रस्त्यावर फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडून सोने खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी अवसरी खुर्द येथील एका दुकानदाराकडे मोटारसायकलवरून दोन व्यक्ती आल्या. त्यांनी दीड किलो वजनाच्या सोन्याच्या माळा दाखवत त्यातील एका माळेतून दोन खरे सोन्याचे मणी काढून दिले. हे मणी सोनाराकडे तपासून पाहा, मगच आमच्याकडून दागिने घ्या, असे त्यांनी सांगितले. दुकानदाराने सोनाराकडे तपासणी केल्यानंतर मणी खरे असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्या दोघांवर विश्वास बसला. दागिने कुठून आणले, असे विचारले असता संबंधित व्यक्तींनी ’नारायणगाव येथे जुने घर पाडताना आम्हाला सोन्याचा डबा सापडला आहे,’ अशी खोटी माहिती दिली. त्यानंतर संगमनेर येथे पाच लाख रुपयांत व्यवहार करण्याचे ठरले; मात्र दुकानदाराकडे तत्काळ एवढी रक्कम नसल्याने दोन लाख रुपयांत सौदा ठरविण्यात आला.
यानंतर दुकानदार संगमनेर येथील बसस्थानकात गेला असता संबंधित दोघे तेथे आले. त्यांनी दोन लाख रुपये घेतले व दीड किलो वजनाच्या सोन्याच्या माळा दुकानदाराला देऊन निघून गेले. त्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्तींनी आपले मोबाईल बंद केल्याने दुकानदाराला संशय आला. मंचर येथील सराफा दुकानात तपासणी केली असता सर्व माळा खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दुकानदार मंचर पोलिस ठाण्यात गेला व सर्व घटनाक्रम सांगितला; मात्र बदनामी होईल या भीतीपोटी त्याने अधिकृत तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या टोळीचे मनोबल वाढल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.
स्वस्तात सोने मिळते, या आमिषाला बळी पडू नये. घराघरांत, रस्त्यावर किंवा अनोळखी व्यक्तींकडून सोने विक्रीसाठी आले, तर तत्काळ मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. सतर्कता हीच फसवणूक टाळण्याची खात्रीशीर उपाययोजना आहे.श्रीकांत कंकाळ, पोलिस निरीक्षक, मंचर