

सुनील कडूसकर
पुणे: कोथरूडमधील डेक्कन-हॅपी कॉलनी (प्रभाग क्रमांक 29) या प्रभागावर गेल्या दोन दशकांपासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या महापालिका निवडणूक निकालाने पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला नवी तटबंदी लाभली आहे. या प्रभागाला मिळालेल्या नव्या शिलेदारांनी तब्बल 65 ते 70 टक्के मते मिळवून ती अधिकच भक्कम केली आहे.
भाजपच्या प्रभावाखाली असलेल्या या प्रभागातून भाजपची उमेदवारी मिळणे म्हणजेच विजयी होणे, असे जणू समीकरणच झाले आहे. या प्रभागात भाजपला मानणाऱ्या मतदारांची संख्या प्रचंड आहे. उमेदवार कोणीही असो मत कमळालाच, असा येथे प्रघात आहे. त्यामुळेच विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही या भागातून भाजपच्या उमेदवाराला लक्षणीय आघाडी मिळते.
डेक्कन-हॅपी कॉलनी प्रभागाची अशी ख्याती असल्यानेच येथून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू असते. कोणी समाजोपयोगी कामाने, कोणी प्रामाणिकपणाच्या कार्डावर, कोणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोरावर, तर कोणी आमदार-खासदारांचे निकटवर्ती असल्याचे भासवत येथील उमेदवारीवर दावा सांगत असतात. खरेतर विजयी होणाऱ्या सिटिंग उमेदवाराला सहजासहजी बदलण्याचा धोका कोणताही राजकीय पक्ष घेत नाही. परंतु, अत्यंत सेफ समजल्या जाणाऱ्या या प्रभागात भाजपने दीपक पोटे, माधुरी सहस्रबुद्धे आणि जयंत भावे या अनुभवी व कार्यक्षम नगरसेवकांना डावलून त्यांच्या जागी पुनीत जोशी, सुनील पांडे आणि मिताली सावळेकर या नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने नवे उमेदवार दिल्याने विरोधी पक्षाच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. एकेकाळी प्रभागातील काही भागांवर काँग््रेास, शिवसेना व मनसेचा प्रभाव होता. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत भाजपपुढे कडवे आव्हान निर्माण करण्याचा चंग बांधला. शिवसेना (उबाठा) व मनसे एकत्र आले. त्यांनी भाजपविरोधात प्रत्येक गटात एकच उमेदवार देण्याचे ठरविले, तर काँग््रेास व शिवसेना (शिंदे गट) यांनीही काही प्रभागांत उमेदवारी देऊन आपली व्होटबँक कॅश करण्याचे ठरविले.
परंतु, ’अ’ गटात भाजपचे उमेदवार सुनील पांडे विरुद्ध मनसेचे उमेदवार राम बोरकर यांच्यात झालेल्या लढतीखेरीज अन्य गटात शिवसेना, काँग््रेास आणि शिंदे सेनेचे उमेदवार फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. ’ब’, ’क’ आणि ’ड’ गटात अनुक्रमे ॲड. मिताली सावळेकर 19,341, मंजुश्री खर्डेकर 20,088 आणि पुनीत जोशी 19,594 मतांच्या फरकाने विजयी झाले. ’अ’ गटात मनसेच्या राम बोरकरांनी 8 हजार 614 मते घेत पांडे यांना झुंजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांडेंनीही 14 हजार 122 मतांच्या फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
या प्रभागात भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. परंतु, एबी फॉर्म वाटपापासून मतदानापर्यंत युती व आघाडीबद्दलचे घोळ संपले नाहीत. भाजप-शिवसेनेची युती आहे की नाही, आघाडीत काँग््रेास आहे की नाही, हे उमेदवारांनाही अखेरपर्यंत समजले नाही. परिणामी, एकत्रित व प्रभावी प्रचाराअभावी उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचताच आले नाही. कित्येक उमेदवारांची नावे तर मतदानाच्या वेळीच मतदारांना समजली. त्याउलट भाजपच्या उमेदवारांनी मात्र एकत्रितपणे फिरून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्लिपाही घरोघर पोहचल्या. तसेच, मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढण्याचे प्रयत्नही त्यांच्याकडून झाले. या सर्वांचा परिणाम म्हणूनच भाजपने आपला हा बालेकिल्ला अभेद्य तर राखलाच; परंतु त्याची तटबंदीही अधिक मजबूत केली.
‘नोटा’ला मोठी पसंती...
’यापैकी कोणताही उमेदवार योग्य नाही’ (नन ऑफ द अबॉव्ह - नोटा) या पर्यायालाही या प्रभागात लक्षणीय मते मिळाली. 34 हजार 775 मतदारांपैकी दीड ते दोन हजार मतदारांनी हा पर्याय स्वीकारला.