सोमेश्वरनगर: राज्यातील अग्रेसर सहकारी साखर कारखान्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३९५१ रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. अनुदानासह ही रक्कम प्रतिटन ४३०१ रुपयांपर्यंत जाणार असून, सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासातील ही आजवरची सर्वाधिक पहिली उचल ठरली आहे. पुणे जिल्ह्यातील चालू हंगामातील ही सर्वाधिक पहिली उचल ठरली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे व उपाध्यक्ष संग्राम सोरटे यांनी रविवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून, सभासद आणि गेटकेनधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी शनिवारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३९०० रुपये ऊसदर जाहीर केला होता. सातारा जिल्ह्यातील बहुतांश खासगी साखर कारखान्यांनीही प्रतिटन ३९०० रुपये दर निश्चित केला आहे.
तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यापूर्वीच प्रतिटन ३५०१ रुपये दर जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याने ३९५१ रुपयांची पहिली उचल जाहीर करत पुणे जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
सोमेश्वर कारखान्याने जाहीर केलेल्या या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः सभासदांसह गेटकेनधारक शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.