Mahatma Phule Wada Pudhari
पुणे

Mahatma Phule Memorial Expansion: महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराला गती! ३०० कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा मार्ग मोकळा

५,६०८ चौरस मीटर जागेचे संपादन होणार; ५९२ मालक आणि ३२६ भाडेकरूंच्या पुनर्वसनाचे नियोजन पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाच्या विस्तार आणि विकास प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण आणि मालमत्ताधारकांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण झाले असून, आचारसंहिता संपताच भूसंपादन आणि पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पुणे महापालिकेने केली आहे. राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी एमआरटीपी कायद्यातील तरतुदीनुसार एकूण ५ हजार ६०८ चौरस मीटर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये ५ हजार ३१० चौरस मीटर खासगी जागेसह २९८ चौरस मीटर रस्त्याच्या जागेचा समावेश आहे. या परिसरातील १०१ सीटीएस क्रमांकांतील ५९२ मालक आणि ३२६ भाडेकरूंचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया महापालिकेने हाती घेतली आहे.

प्रकल्पासाठी संबंधित मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, मालकांची नावे, मालमत्तेचे क्षेत्रफळ आणि प्रॉपर्टी कार्ड आदी कागदपत्रांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध झाली आहे. मालकांना रेडीरेकनरच्या चौपटदराने मोबदला देण्यासह उपलब्ध सदनिकांचा पर्याय देण्यात येणार आहे. तर जुन्या भाडेकरूंना उपलब्ध सदनिका भाड्याने अथवा १५ लाख रुपयांचा रोख मोबदला देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. यापूर्वी प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी १०० कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले असून, उर्वरित निधीची प्रक्रियाही सुरू आहे. आता सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्याने आणि पुनर्वसनाचा स्पष्ट पर्याय उपलब्ध झाल्याने प्रकल्पातील प्रमुख अडथळे दूर झाले आहेत.

स्मारक उभारणीतील महत्त्वाचे टप्पे पूर्ण

प्रकल्पासाठी आवश्यक मालमत्तांचे सर्वेक्षण, मालक व भाडेकरूंची माहिती संकलित करणे आणि कागदपत्रांची पडताळणी ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दि. २५ ऑगस्ट रोजी पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भूसंपादन आणि ताबा प्रक्रियेला गती देऊन स्मारक विस्ताराचे काम प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पुनर्वसनासाठी असे आहेत पर्याय

  • जागा मालक: रेडी रेकनरच्या चौपट दराने मोबदला किंवा त्या रकमेच्या उपलब्ध सदनिकांचा पर्याय.

  • भाडेकरु : उपलब्ध सदनिका भाड्याने किंवा १५ लाख रुपयांचा रोख मोबदला.

  • भूसंपादन: एकूण ५ हजार ६०८ चौरस मीटर जागेचे संपादन.

  • पुनर्वसन: ५९२ मालक आणि ३२६ भाडेकरू.

महात्मा फुले स्मारकाचा विस्तार हा पुण्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाशी जोडलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्व संबंधितांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, मालक आणि भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी स्पष्ट पर्याय देण्यात आले आहेत. शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे आता भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्यावर भर दिला जाईल.
अविनाश सपकाळ, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT