

पुणे: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात ५० तोळ्यांपैकी ३५ तोळे सोने जप्त करण्यात आले असून, उर्वरित १५ तोळे सोने अद्याप हस्तगत करणे बाकी आहे. तसेच, हुंड्याच्या मागणीसाठी वापरल्याचा आरोप असलेला सासूचा मोबाईल जप्त करणे आणि फरार नणदेचा शोध घेणे आवश्यक असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली.
ती मान्य करीत न्यायालयाने पायलचा पती अक्षय अरविंद झांबरे, सासरा अरविंद वसंतराव झांबरे आणि सासू मंगल अरविंद झांबरे या तिघांच्या पोलिस कोठडीत दि. ११ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नंदिता के. मुथा यांनी सोमवारी (दि. ९) हा आदेश दिला.
हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी तपास अधिकाऱ्यांनी वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली.
गुन्ह्यातील उर्वरित सोन्याचा शोध घेण्याबरोबरच सासूचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. तसेच, फरार नणदेचा शोध घेऊन तपास पूर्ण करायचा असल्याचे फिर्यादीच्या वतीने ॲड. पुष्कर पाटील, ॲड. ऋतुराज पासलकर आणि ॲड. आकाश कामठे यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, बचाव पक्षाने वाढीव पोलिस कोठडीला तीव्र विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासाची कागदपत्रे आणि केस डायरीची पाहणी केली. उर्वरित सोन्याचे दागिने आणि मोबाईल हस्तगत करणे बाकी असून, तपास तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यानुसार तिघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.