

पुणे: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडतर्फे (पीआयटीसीएमआरएल) पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रो रेल्वेची सुबक लघुप्रतिकृती भेट देण्यात आली.
पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी यांच्या हस्ते ही प्रतिकृती मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आली. प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान उरलेल्या टाकाऊ साहित्यातून सुमारे दोन किलो गॅल्व्हनाइज्ड आयर्न (जीआय) चा वापर करीत हे अनोखे स्मृतिचिन्ह तयार करण्यात आले आहे.
वेल्डिंग आणि आकार देण्यापासून ते बारकावे साकारण्यापर्यंत आणि अंतिम स्वरूप देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष मेहनत घेण्यात आली. फक्त स्मृतिचिन्ह म्हणूनच नव्हे, तर पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या साहित्याचा सर्जनशील पुनर्वापर कसा करता येऊ शकतो, याचे प्रतीक म्हणूनही ही प्रतिकृती महत्त्वाची आहे.