TET Exam Pudhari
पुणे

Maharashtra TET Exam Guidelines: टीईटी परीक्षेसाठी कडक नियमावली; बुरखा, दुपट्टा, मोबाईलला बंदी

२८ जूनच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेचे निर्देश; सीसीटीव्ही देखरेखीत परीक्षा होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २८ जूनला घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेसाठी कडक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार परीक्षा केंद्रात दुप्पट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही. तसेच, परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर, डिजिटल घड्याळ, पेन असे कोणतेही इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाता येणार नाही, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा परिषदेचा उद्देश नाही. परीक्षा ही सीसीटीव्हीच्या देखरेखी खाली होत असल्याने प्रत्येक उमेदवाराचा मानेवरील भाग दिसलाच पाहिजे. त्यामुळे डोके, पूर्ण चेहरा, कान या गोष्टी दिसल्याच पाहिजे. त्यामुळे कोणी काय पोषाख परिधान करावा, यावर कोणतेही निर्बंध घातले गेले नाही, असा खुलासा राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. बेडसे यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यातील ६ लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, एसबीआय आदी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसह एमपीएससी, यूपीएससीसारख्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये चेहरा झाकणारे कपडे दुप्पट्टा, बुरखा, स्कार्प, टोपी , गॉगल्स यांना प्रतिबंध घातला आहे. कारण ओळख पडताळणी बायोमेट्रिक तपासणी आणि संपूर्ण परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही पडताळणी प्रक्रियेमध्ये चेहरा स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.

परीक्षांमध्ये चेहऱ्यावरील हिजाब , बुरखा किंवा दुप्पट्टा यावर बंदी घालण्यामागे मुख्य उद्देश लाईव्ह सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा कालावधीत सर्व उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी सुलभ करणे व पर्यायाने परीक्षेमधील पारदर्शकता, विश्वासार्हता कायम ठेवणे हा आहे.

नुकत्याच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या डीएड व संगणक लघुलेखक परीक्षेमध्ये उमेदवारांनी दुप्पट्टा, बुरख्यामध्ये मोबाईल लपून परीक्षा केंद्रामध्ये आणल्याचे व वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परीक्षेमध्ये कडक नियमावली करण्यात आल्याचे राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT