SSC HSC Board Pudhari
पुणे

Maharashtra SSC 10th Result: दहावीचा निकाल रखडला; 117 विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप प्रलंबित

राज्य मंडळाने निकाल जाहीर करूनही 117 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 8 मे रोजी इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. तब्बल 117 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आमचाच निकाल का राखून ठेवण्यात आला असा प्रश्न संबंधित विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

कॉपी केस, परीक्षेदरम्यान गैरप्रकार किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला जाऊ शकतो. परंतु, कोणताही गैरप्रकार किंवा परीक्षेच्या नियमांचा भंग केलेला नसताना काही विद्यार्थ्यांचा निकाल राज्य मंडळाने राखीव ठेवला.

निकाल पाहता येत नसल्यामुळे विद्यार्थी सध्या तणावाखाली आहेत. त्यांचे पालकही हतबल झाले आहेत. शाळांकडे याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्यामुळे आता काय करावे, असा पालकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत बोलताना पुण्यातील रहिवासी संदीप थोरात म्हणाले, माझ्या मुलीचा निकाल अद्याप लावण्यात आलेला नाही. आज 4 दिवस उलटले मात्र आम्हाला राज्य मंडळाकडून कल्पना देण्यात आलेली नाही.

जेजुरी येथील रहिवासी आणि जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया वाईकरचा देखील निकालदेखील अद्याप मिळाला नसल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात राज्य मंडळाकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT