सुनील जगताप
पुणे: मैदानावरील घाम गाळणाऱ्या आणि राज्याच्या क्रीडा क्षितिजावर आपल्या कौशल्याची मोहोर उमटवणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील माध्यमिक (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक (इ. 12 वी) प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनाने यासाठी कंबर कसली आहे.
यशाच्या शिखरासाठी गुणांची शिडी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, पात्र खेळाडूंचे प्रस्ताव शिफारशींसह विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिलपर्यंत निश्चित केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत या सुविधेचे ‘सुलभीकरण’ केले असून, यामुळे आता लालफितीच्या कारभारात न अडकता खेळाडूंना त्यांचे हक्काचे गुण वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या खेळातील खेळाडू राहणार वंचित
दुसरीकडे क्रिकेट, सिकई, डॉजबॉल आणि थोबॉल यांसारख्या खेळांच्या संघटनांना तांत्रिक मान्यता किंवा संलग्नता नसल्यामुळे या खेळांतील विद्यार्थ्यांना या वर्षी क्रीडागुणांच्या सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
या 43 खेळांचा समावेश
ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, ज्युदो, टेबल टेनिस, वुशू, वेटलिफ्टिंग सॉफ्टबॉल, बेसबॉल, बुद्धिबळ, स्क्वॅश, रग्बी, कुस्ती, आर्चरी, जिम्नॅस्टिक, रायफल शूटिंग, बॅडमिंटन, हँडबॉल, टेनिस, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, तायक्वांदो, नेटबॉल, मॉडर्न पेंटॅथलॉन, कबड्डी, खो-खो, सॉफ्टटेनिस, सेपक टकरा, मल्लखांब, आट्यापाट्या, बॉलबॅडमिंटन, कॅरम, रोलबॉल, किकबॉक्सिंग, योगासन, शूटिंगबॉल, टेनिक्वाईट, रोलर स्केटिंग, कराटे या खेळांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये सुबतो मुखर्जी फुटबॉल आणि नेहरू कप हॉकी स्पर्धांचाही अंतर्भाव आहे.
एकही पात्र खेळाडू विद्यार्थी केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे या सवलतीपासून वंचित राहता कामा नये. जर एखादा खेळाडू या गुणांपासून वंचित राहिला तर संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगविषयक कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यामुळे प्रत्येक खेळाडू लाभ मिळाला पाहिजे.उदय जोशी, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय