

पुणे: महापालिकेत येऊन पिस्तूल घेऊन फिरलात, तर थेट नगरसेवक पदच गमावावे लागणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांना लगाम लागणार आहे. चार वर्षांनंतर महापालिका निवडणुका झाल्याने आता महापालिकेत नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक यांची रोज गर्दी होऊ लागली आहे.
त्यातच महापालिकेत येताना काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांकडून परवानाधारक पिस्तूल घेऊन येत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मुख्यसभेला जाताना एका नगरसेवकाने थेट पिस्तूल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या सुरक्षा विभागाने महापौरांच्या सुरक्षिततेसाठी थेट डोअर फेम मेटल डिटेक्टर बसविले आहे.
यासंबंधीचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रकाशित केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी आता अशा पिस्तूल घेऊन येणार्या नगरसेवकांवरही कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. परवाना असलेले पिस्तूल असले तरी महापालिकेत ते घेऊन येण्यास परवानगी नाही. अशा पद्धतीने नगरसेवकाने जर पिस्तूल आणले तर त्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.