

पुणे: राज्याच्या पणन संचालकांच्या रिक्तपदी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सहकारी संस्थांचे अपर निबंधक शरद जरे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आल्याचे सहकार विभागाचे उप सचिव नितिन गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार बुधवारी जरे हे पणन संचालक पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारतील, अशी माहिती पणन संचालनालयातील सूत्रांनी दिली.
विद्यमान पणन संचालक या पदाच्या अतिरिक्त पदभारासंदर्भात दिनांक 28 नोव्हेंबर 2025 च्या आदेशाअन्वये सहकारी संस्थांचे अपर निबंधक व राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्याकडे करण्यात आलेली स्थानिक व्यवस्था मंगळवारी (दि.7) शासनाने काढलेल्या आदेशान्वये संपुष्टात आल्याचे म्हटले आहे.
जरे यांनी गेली 31 वर्षे शासनाच्या विविध विभागात काम केले आहे. अहिल्यानगर, नाशिक, औरंगाबाद जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक औरंगाबाद, कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक, सोलापूर येथे वस्त्रोद्योग उपसंचालक, नागपूर येथे वस्त्रोद्योग सह आयुक्त, साखर सह संचालक (उपपदार्थ) पदावरही त्यांनी काम पाहिलेले आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात त्यांनी कृषी पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.