पुणे: आजीव सभासदांची यादी अद्ययावत करणे, साहित्य परिषदेत डिजिटल व्यासपीठावर आणण्यासह पुण्यात होणारे आगामी शंभरावे साहित्य संमेलन देदीप्यमान करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी सोमवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत यांनी सांगितले. गुरुवारी (दि. 19) गुढीपाडव्याच्या दिवशी पुस्तकांची गुढी उभारून परिषदेच्या कामास आमची कार्यकारिणी सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सोमवारी साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयी उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील उपक्रमांबाबतची माहिती दिली. नवनिर्वाचित प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोशाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, नितीन संगमनेरकर आदी उपस्थित होते. एप्रिलपासून महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची सूत्रे नवीन कार्यकारिणीकडे येणार असून, प्रत्यक्ष कामकाजाला 1 एप्रिलपासून सुरुवात करणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.
आगामी उपक्रमांची माहिती देताना सोमण म्हणाले, आम्ही वेगवेगळे उपक्रम राबविणार आहोत. मसापची आजीव सभासदांची यादी अद्ययावत करण्यावर भर असणार आहे. हे वर्षभर चालणारे काम आहे. त्यासाठी पदाधिकारी हे मसापच्या शाखांना भेटी देऊन माहिती गोळा करून यादी अपडेट करण्याचे काम करणार आहे. तसेच, परिषदेची साहित्य पत्रिका आता डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे.
पण, निवडणुकीच्या निमित्ताने विविध शाखांना भेटी दिल्यावर 95 टक्के सभासदांनी छापील स्वरुपातील पत्रिका पुन्हा सुरू करा, अशी मागणी केली होती. साहित्य पत्रिकेचा संदर्भ पुस्तिका म्हणून वापर व्हायचा. पत्रिकेमध्ये शाखांमध्ये झालेले विविध उपक्रम, कविता, लेख असायचे. साहित्य परिषदेतील शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यामधील सुसंवाद असायचा, म्हणून सभासदांच्या मागणीमुळे छापील स्वरुपातील पत्रिका आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत.
निफाडकर यांनी सभासदांच्या नवीन नावनोंदणी आणि नावनोंदणीसाठीचे शुल्क कमी करण्यावर चर्चा करून निर्णय घेऊ, सभासदत्वासाठीच्या जुन्या अर्जांचीही माहिती घेणार आहोत, असे नमूद केले. तर साहित्य परिषद पूर्णपणे डिजिटल करण्यासह साहित्य महामंडळाचे संकेतस्थळ सुरू करणार आहोत, अशी माहिती महाळंक यांनी दिली.