Maharashtra Cooperative Policy Pudhari
पुणे

Maharashtra Cooperative Policy: महाराष्ट्राचे नवीन सहकारी धोरण सर्वसमावेशक व भविष्योन्मुख : बाबासाहेब पाटील

राष्ट्रीय सहकार धोरणानंतर राज्य पातळीवर स्वतंत्र धोरण; ‘सहकार मंथन’ परिषदेत सहकारमंत्र्यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय सहकार धोरण निश्चित झाल्यानंतर आता विविध राज्यांमध्ये स्वतंत्र सहकारी धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात तयार होणारे नवीन सहकारी धोरण हे सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख असेल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

येथील कॉसमॉस सहकारी बँक आणि ग््राीन वर्ल्ड पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‌’सहकार मंथन‌’ या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन कॉसमॉसच्या मुख्यालयात रविवारी (दि. 21) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सत्रावेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते आणि ग््राीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल व मान्यवर उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, “राज्याचे सहकार धोरण तयार करताना सहकार मंत्रालयाकडून विभागनिहाय बैठकांचे आयोजन करून त्या-त्या भागातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी व संस्थांचे अनुभव आणि सूचना नोंदवण्यात येत आहेत. या सगळ्या मतांचा समावेश करूनच धोरण अधिक व्यापक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

जागतिक सहकार वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ‌‘सहकार मंथन‌’ कार्यक्रमाला राज्यातील सहकार क्षेत्रातील संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यामध्ये सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध उत्पादक संघ, सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायट्या तसेच सहकारी गृहरचना संस्थांसह 78 सहकारी संस्थांनी सहभाग नोंदवला. यामध्ये राज्यातील विविध संस्थांचे 350 हून अधिक अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. या मंथन सत्रांमध्ये सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तसेच डेटा प्रोटेक्शन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

सहकार क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि भविष्यातील धोके याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही निवडक संस्थांना राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते ‌’ग््राीन वर्ल्ड को-प्राईड 2025‌’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्याचे नवीन सहकार धोरण ठरवताना सहकाराबाबतचा इतर राज्यांमधील चांगल्या पद्धतींचाही अभ्यास केला जाईल. सहकारी संस्थांनी तरुण आणि महिलांचा सक्रिय सहभाग वाढवला पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून अधिक सक्षम व्हायला हवे.
दीपक तावरे, सहकार आयुक्त, पुणे.
सहकारातून समृद्धी हवी असेल तर आधी सहकार समाजात रुजला पाहिजे. समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार हा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. कॉसमॉस बँकेने सर्वसमावेशक धोरण स्वीकारून व्यावसायिक दृष्टिकोनातून यशस्वी वाटचाल केली आहे.
सीए मिलिंद काळे, अध्यक्ष, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, कॉसमॉस सहकारी बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT