

मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रस्तावित आहेत. त्याचा एक भाग म्हणून मंदिर सभामंडपाचे आणि दर्शनबारीच्या पायऱ्यांचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर अंदाजे 3 महिने बंद ठेवण्याची तयारी प्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान असून, देशभरातून हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. 2026 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार असल्याने येथील भाविकांची मोठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मंदिर परिसरात विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये दर्शन रांगा, सभामंडप, सुविधा केंद्रे आणि परिसराचा समावेश आहे.
विकासकामांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून अद्याप बंदची अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. येत्या आठवडाभरात विकासकामांची पाहणी करण्यासाठी विशेष समिती भीमाशंकर येथे येणार असून, त्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गुरुवार, दि. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि त्यानंतर नववर्ष सुरू होत असल्याने भाविकांनी शक्य असल्यास लवकर दर्शन घेण्याचेही सूचित केले आहे. मंदिर किती कालावधीसाठी आणि कोणत्या तारखेपासून बंद राहील, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मंदिर विकासकामांसाठी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
अधिकृत तारीख जिल्हाधिकारी जाहीर करतील
मंदिर बंद ठेवण्याची अधिकृत तारीख जिल्हाधिकारी जाहीर करतील. त्यानंतरच प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात केली जाईल, अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडेगाव येथील अधिकाऱ्यांनी सांगितली.