

ओतूर: खिरेश्वर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात ओतूर पोलिसांनी 48 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, तर तीन जणांना ताब्यात घेत गुटखा वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
ओतूरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांना खिरेश्वर गावच्या हद्दीत रविवारी (दि. 21) रात्रीच्या सुमारास कंटेनरमधून गुटखा पिकअप वाहनात भरला जाणार अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकासह खिरेश्वर गावचे पोलीस पाटील अभिजित भौरले, खुबी गावचे पोलीस पाटील अविनाश सुपे, ग््राामस्थ नीलेश भौरले, दीपक मेमाणे यांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी कंटेनर (एमएच 01 सीव्ही 9125) मधून गुटख्याने भरलेली पोती पिकअप (एमएच 14 जीयू 3789) या वाहनामध्ये टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी सूरज रघुनाथ मेगळे (वय 23), अतुल अनिल काळे (वय 25), माउली विठ्ठल काळे (वय 18, रा. रोहोकल, ता. खेड) या तिघांना ताब्यात घेतले, तर कंटेनरचालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याची माहिती ओतूर पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी कंटेनर व पिकअप टेम्पो गुटख्यासह ताब्यात घेतला. दोन्ही वाहनांतील मिळून शशी शेखर एंटरप्रायजेस कंपनीचा शुद्ध प्लस पान मसाला व नवी च्युविंग तंबाखू असा एकूण 28 लाख 40 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा व 20 लाखांची दोन्ही वाहने असा एकूण 48 लाख 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल ज्योतीराम पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास ओतूरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे हे करत आहेत.
ही कारवाई पुणे ग््राामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे प्रभारी लहु थाटे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलिस हवालदार देविदास खेडकर, बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, पोलिस कॉन्स्टेबल ज्योतीराम पवार, मनोजकुमार राठोड, संतोष भोसले, रोहित बोंबले यांनी केली आहे.