Milk Pudhari
पुणे

Maharashtra Milk Collection: दुष्काळातही दूध संकलनात वाढ; राज्यात रोज १ कोटी ६२ लाख लिटरचा टप्पा

गायीच्या दुधाचा खरेदी दर लिटरमागे ४२ रुपयांवर; जनावरांचे संगोपन, चाऱ्याचे नियोजन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात सहकारी व खाजगी डेअऱ्यांकडे मिळून प्रतिदिन 1 कोटी 61 लाख 40 हजार लिटरइतके दूध संकलन होत होते. ते मागील सप्टेंबर महिन्यात सुमारे 1 लाखच 42 हजार लिटरने वाढून 1 कोटी 62 लाख 82 हजार लिटरइतके होत आहे. म्हणजे 1.42 लाख लिटरने दूध संकलनात झालेली वाढ ऐन दुष्काळात चांगली बाब म्हणावी लागेल. त्यामागे शेतकऱ्यांकडून जनावरांचे होत असलेले चांगले संगोपन, गायीच्या दुधाला मिळत असलेला वाजवी दर यामुळेच हे शक्य झाल्याचे दुग्ध वर्तुळाचे म्हणणे आहे.

गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा दर लिटरला 37 वरुन 42 रुपयांवर पोहोचला आहे. राज्याच्या दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तालयाच्या ताज्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात सहकार क्षेत्रातील डेअऱ्यांमध्ये प्रतिदिन 35 लाख 94 हजार लिटर तर खाजगी डेअऱ्यांमध्ये 1 कोटी 26 लाख 88 हजार लिटरइतके संकलन झाले. म्हणजेच राज्यात प्रतिदिन 1 कोटी 62 लाख 82 हजार लिटरइतके दूध संकलन झाले.

याबाबत महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले मागील 40 वर्षाच्या माझ्या दुग्ध व्यवसायाच्या अनुभवातून पाहता दुष्काळाची चाहुल लागताच शेतकरी सतर्क होतो. पिकांचे नुकसान झाल्यास दहा दिवसांत हमखास दुधातून रक्कम घरात येते.

त्यामुळे कडबा, भुईमूगाचा पाला, गवत राखून ठेवून जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेस प्राधान्य दिले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पशुधनही वाढविल्याने दूध उपलब्धता वाढीस फायदा झाला आहे. त्यातच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधातील मोहिमेमुळे कारवाई होत आहे. त्यामुळे चांगल्या गुणप्रतिच्या दुधाला मागणी वाढून दरही वाढत असल्याने दुष्काळात दूध व्यवसायच शेतकऱ्यांना तारेल, अशी स्थिती आहे.

वाढत्या उन्हाळ्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून चांगली मागणी सुरु आहे. सध्या नवरात्र आणि आगामी दसऱ्याच्या सणामुळेही दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत आणखी वाढ अपेक्षित आहे. या सर्वांचा परिणाम दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढून गायीच्या दुधाचे खरेदी दर लिटरला 42 रुपयांवर पोहोचले आहेत. यापुढेही दिवाळीचा सण असून लग्नसराई, यात्रा-जत्रांमुळे दुग्ध उत्पादनांना वाढती मागणी राहील. त्यामुळे गायीच्या दुधाच्या खरेदी दरात आणखी वाढ अपेक्षित आहे.
गोपाळराव म्हस्के , अध्यक्ष, राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT