Elephant Pudhari
पुणे

Maharashtra Elephant Corridor: कर्नाटकातून आलेले हत्ती आता महाराष्ट्राचेच रहिवासी; कोल्हापूर-सिंधुदुर्गात सहअस्तित्वाचा प्रयोग

दोन दशकांत पश्चिम घाटात हत्तींचा मुक्काम; १०० हून अधिक गावांत सुरक्षित कॉरिडॉर, मानव-हत्ती संघर्षावर उपाययोजना

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमांवर गेल्या दोन दशकांपासून स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपांनी आता स्थानिक शेती आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यास सुरुवात केली आहे. कधी काळी कर्नाटकातून स्थलांतरित झालेले हे हत्ती आता महाराष्ट्राचे 'पाहुणे' नसून येथीलच रहिवासी झाले आहेत.

भारतात हत्ती हा आपला 'राष्ट्रीय वारसा प्राणी' म्‍हणून घोषित केला असला तरी महाराष्ट्राचा विचार केल्यास हत्ती हा या राज्याचा मूळ रहिवासी प्राणी नाही. परंतु, गेल्या दोन दशकांत भौगोलिक व वातावरणीय बदलांमुळे परिस्थिती बदलली आहे. २००२-०३ च्या सुमारास शेजारील कर्नाटक राज्यातील मुख्यतः दांडेली-अंशी व उत्तर कन्नड क्षेत्रातील जंगलांतून रानटी हत्तींनी महाराष्ट्राच्या सीमेवर प्रवेश केला. सुरुवातीला ये-जा करणारे हे हत्ती पुढे कोल्हापुरातील चंदगड, आजरा तालुके आणि सिंधुदुर्गमधील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ तालुके या जिल्ह्यांच्या पश्चिम घाट परिसरामध्ये स्थिरावले. सध्या या भागात लहान-मोठ्या गटांत मिळून काही हत्तींचा वावर कायमस्वरूपी असतो.

गेल्या काही वर्षांत आंबा, काजू आणि भातशेतीचे होणारे नुकसान, यामुळे स्थानिक शेतकरी आणि हत्तींमध्ये संघर्ष तीव्र झाला होता. हत्तींचा वावर असलेल्या १०० हून अधिक गावांतून हत्तींसाठी सुरक्षित अभिसरण मार्ग निश्चित केला जात आहे. त्याचबरोबर वन विभागाने 'हत्ती संवादकां'ची फळी तयार केली असून, ते स्थानिकांना हत्तींच्या सवयी आणि त्यांच्याशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील हा 'सहअस्तित्वाचा प्रयोग' भविष्यात देशातील अन्य राज्यांसाठी एक आदर्श ठरणार आहे.

मानव-हत्ती संघर्ष, जंगलांचे

विखंडन, खाणकाम आणि रेल्वेमार्ग किंवा इतर विकास प्रकल्पांमुळे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारतर्फे १९९२ मध्ये 'प्रोजेक्ट हत्ती' सुरू केला आहे. याद्वारे हत्तींचे नैसर्गिक अधिवास टिकवणे, पाळीव हत्तींचे आरोग्य सांभाळणे आणि मानव-हत्ती संघर्ष रोखण्यासाठी राज्यांना आर्थिक व तांत्रिक मदत दिली जात आहे.

हत्ती कॉरिडॉरची सद्यःस्थिती (भौगोलिक क्षेत्रानुसार)

  • पूर्व-मध्य भारतात ३५ टक्‍के (५२)

  • ईशान्य भारतात ३२ टक्‍के (४८)

  • दक्षिण भारतात २१ टक्‍के (३२)

  • उत्तर भारतात १२ टक्‍के (१८) कॉरिडॉर

  • देशात हत्तींची एकूण संख्या २२,४४६

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी केलेल्या हत्ती गणनेमधून देशात हत्तींची एकूण संख्या २२,४४६ इतकी आहे. हत्तींच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या संख्येची राज्यवार माहिती...

राज्य हत्तींची अंदाजे संख्या

  • कर्नाटक ६,०१३ (देशात सर्वाधिक)

  • आसाम ४,१५९

  • तामिळनाडू ३,१३६

  • केरळ २,७८५

  • उत्तराखंड १,७९२

  • ओडिशा ९१२

  • अरुणाचल प्रदेश ६०० हून अधिक

  • छत्तीसगड ४५१

  • उत्तर प्रदेश २५७

  • झारखंड २१७

  • आंध्र प्रदेश १२०

  • महाराष्ट्र ६३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT