

पुणे: भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका पथकाने दोन 'मृत' ताऱ्यांची एक विलक्षण जोडी शोधून काढली आहे. हे दोन्ही ताऱ्यांचे अवशेष अवघ्या सहा मिनिटांत एकमेकांभोवती एक फेरी पूर्ण करतात आणि त्यांची कक्षा अत्यंत वेगाने आकुंचन पावत आहे.
त्यामुळे ही जोडी भविष्यातील अवकाशातील गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी एक महत्त्वाचा स्रोत ठरू शकते, असे संशोधन पुण्यातील आयुका संस्थेतील खगोलशास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनाचे नेतृत्व आयुका (आंतरविद्यापीठीय भौतिकी आणि खगोल संशोधन संस्था) पुणे येथील डॉ. राहुल शर्मा आणि प्रा. चांद्रेयी मैत्रा यांनी केले.
आरएएसएसयू-जे-६०८ या नावाने ओळखली जाणारी ही जोडी दोन श्वेत बटू ताऱ्यांची आहे. सूर्याप्रमाणे ताऱ्यांचे इंधन संपल्यानंतर त्यांच्या मागे उरलेला अत्यंत दाट गाभा म्हणजे श्वेत बटू. या दोन्ही ताऱ्यांमधील अंतर अत्यंत कमी असून, ते एकमेकांभोवती अवघ्या ३७४ सेकंदांत फिरतात.
या ताराकीय जीवाश्म युगलाचा शोध प्रथम ई-रोस्टा या एक्स-रे अवकाश दुर्बिणीच्या सर्वेक्षणातून लागला. त्यानंतर चीनच्या आइनस्टाईन प्रोबने मोहिमेतील निरीक्षणे, नासाच्या दुर्बिणीच्या निरीक्षणांचा अभ्यास करण्यात आला. सुमारे साडेतीन वर्षांच्या निरीक्षणांमधून या ताऱ्यांची कक्षा अत्यंत वेगाने कमी होत असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहेत निरीक्षणे..?
संशोधकांच्या मते, या कक्षेच्या आकुंचनाचे प्रमुख कारण
गुरुत्वीय लहरींमुळे कमी झालेली ऊर्जा असावे. गुरुत्वीय लहरी म्हणजे अवकाश-कालात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरी. या द्वैती प्रणालीची कक्षा जितक्या वेगाने आकुंचन पावते, तितक्या शक्तिशाली गुरुत्वीय लहरी निर्माण होण्याची शक्यता असते.
या जोडीतील एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्याकडे पदार्थ थेट वाहत जाऊन त्याच्या पृष्ठभागावर आदळत असल्याचेही मानले जाते.
या प्रक्रियेमुळे दहा लाख अंशांहून अधिक तापमान निर्माण होऊन तीव्र एक्स-रे किरणोत्सर्ग होतो. यासारख्या अवकाशातील गुरुत्वीय लहरी शोधकांसाठी महत्त्वाची लक्ष्य प्रणाली ठरू शकते. तिच्याकडून अपेक्षित गुरुत्वीय लहरींचे संकेत आधीच अचूकपणे भाकीत करता येत असल्याने भविष्यात या निरीक्षणांची पडताळणी करण्यासाठी ही एक स्रोत ठरू शकते.