

पुणे: पंजाबमधील लुधियाना शहरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पुण्यात आणण्यात आले. मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६' अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद रईस मोहम्मद रफीक शेख (वय २१, मूळ रा. फिरोजपूर, मलिहाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील हे शिवणकाम करतात. ते मूळचे उत्तर प्रदेशातील फिरोजपूरचे आहे. गेल्या १६ वर्षांपासून ते पंजाबमधील लुधियाना शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची १७ वर्षांची मुलगी लुधियानातील एका शाळेत शिक्षण घेत होती. १४ ऑगस्ट २०२५ रोजी ती घरातून शाळेत जाते, असे सांगून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. मुलगी घरी न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी लुधियानातील सराभानगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर मुलीने ३० जुलै २०२६ रोजी आईच्या मोबाइलवर संपर्क साधला. उत्तर प्रदेशातील मूळगाव फिरोजपूरमध्ये राहणारा आरोपी तरुण शेख याच्यासोबत पुण्यातील हडपसर भागात वास्तव्य करीत असल्याचे तिने सांगितले. मुलीने तिचे वास्तव्याचे ठिकाण (लोकेशन) आईला पाठविले. तेव्हा मुलगी फुरसुंगी भागातील हांडेवाडी रस्त्यावरील परिसरात आरोपीसोबत राहत असल्याची माहिती मिळाली, असे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.
'त्यानंतर मुलीचे वडील आणि काका हे ४ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलिस ठाण्यात आले. पोलिसांच्या मदतीने मुलगी आणि आरोपी शेख याला पोलिस ठाण्यात आणले. शेखने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यात आणले. तुझे शिक्षण पूर्ण करतो, असे आमिष त्याने दाखविले. त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. माझ्याशी विवाह करायचा असेल, तर तुला धर्म बदलावा लागेल, असे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. पंजाबमधून मुलीला पळवून नेल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन अलीगड, कर्नाटकातील कोलार येथे नेले. गेले दोन महिने आरोपी मुलीसोबत हांडेवाडीत राहत होता,' अशी माहिती फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.
'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६' अन्वये पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ५ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी खडक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. फुरसुंगीतील गुन्ह्यात अल्पवयीन मुलीवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला होता. खडक पोलिस ठाण्यात एका धर्मगुरूविरुद्ध धर्मप्रसार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
प्रक्रियेनंतर मुलीला पालकांकडे देणार
मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बाल न्यायालयाने तिला निरीक्षणगृहात ठेवले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.