Sowing Pudhari
पुणे

Maharashtra Kharif Sowing: पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात; राज्यात फक्त 20 टक्के पेरण्या पूर्ण

मान्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे मूग-उडद पेरण्या संपुष्टात आल्या असून राज्यात खरीप पिकांचे केवळ 20 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात जून महिन्यात मान्सूनच्या पावसाच्या हजेरीअभावी खरीप हंगामातील प्रामुख्याने मूग आणि उडदाच्या पेरण्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या मूग, उडदाच्या पेरण्याही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुरेशा पावसाअभावी खरीप पिकांच्या जेमतेम 20 टक्‍के क्षेत्रावरील पेरण्या दिनांक 1 जुलैअखेर पूर्ण होऊ शकल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून मिळाली.

राज्याचे खरीप हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र सुमारे 144 लाख 36 हजार 54 हेक्टर इतके आहे. राज्यात गतवर्षी दिनांक 1 जुलैला प्रत्यक्षात 88 लाख 80 हजार 628 हेक्टरवरील म्हणजे सरासरीच्या 62 टक्‍के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

ज्या यंदा 1 जुलै रोजी जेमतेम 28 लाख 39 हजार 363 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 20 टक्‍केच क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण होऊ शकलेल्या आहेत. मान्सूनच्या पावसाने अद्यापही सर्वदूर हजेरी लावलेली नसून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

राज्यात तुरीच्या पिकाखालील क्षेत्र 12 लाख 77 हजार हेक्टर इतके असून, सद्य:स्थितीत 2 लाख 42 हजार 744 हेक्टरवर म्हणजे 19 टक्‍केच पेरण्या पूर्ण होऊ शकलेल्या आहेत. मूग आणि उडदाची पेरणी ही प्रामुख्याने जून महिन्यात केली जाते. जूनमध्ये पावसाची हजेरी नसल्यामुळे या दोन्ही कडधान्यांच्या पेरण्यांचा कालावधी जवळपास संपुष्टात आला आहे.

मुगाची 26 हजार 564 हेक्टर म्हणजे सरासरीच्या ९ टक्‍केच, तर उडदाची 24 हजार 697 हेक्टर म्हणजे 7 टक्‍केच पेरणी पूर्ण होऊ शकलेली आहे. राज्यात गतवर्षी दिनांक 1 जुलै 2025 अखेर मुगाची 1.59 लाख हेक्टर आणि उडदाची 2.58 लाख हेक्टर इतकी उच्चांकी पेरणी झाली होती. त्यातुलनेत यंदाच्या पेरण्या पावसाअभावी होऊ शकलेल्या नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT