

पारगाव: आंबेगाव तालुक्यात सध्या झेंडूच्या फुलांना उच्चांकी बाजारभाव मिळत असून, किलोमागे तब्बल १०० रुपये दर मिळत आहे. अनेक महिन्यांपासून कवडीमोल भावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून, बाजारभावातील वाढीमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, थोरांदळे, वळती, नागापूर, शिंगवे, भागडी, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली जाते; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून झेंडूच्या फुलांना अत्यंत कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नव्हता. रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, औषध फवारणी, मजुरी आणि इतर उत्पादन खर्च वाढला असतानाही झेंडूला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे यात्रा, उत्सव, लग्नसराई, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणासुदीच्या काळातही झेंडूच्या फुलांच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या लागवडीकडे पाठ फिरवली. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली असून, त्याचा परिणाम म्हणून आता बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या रांजणी-थोरांदळे परिसरात झेंडूच्या फुलांची तोडणी वेगाने सुरू असून, वाढलेल्या बाजारभावामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना हा चांगला दर आणखी काही काळ कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सहा महिन्यांपूर्वी झेंडूच्या फुलांना अत्यंत कमी बाजारभाव मिळत होता. त्यामुळे रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, औषध फवारणी आणि लागवडीचा खर्चही निघत नव्हता. सणासुदीच्या काळात देखील चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या पिकाकडे दुर्लक्ष केले. आता बाजारात झेंडूची आवक कमी झाल्याने दर वाढले असून, सध्या किलोला १०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बाबासाहेब भोर, झेंडू उत्पादक शेतकरी, रांजणी