Suman Kalyanpur Tribute: ‘सुमनांजली’ कार्यक्रमातून सुमन कल्याणपूर यांना पुण्यात स्वरांजली

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या ‘सुमनांजली’ कार्यक्रमात अमर ओक यांच्या बासरीवादनातून दिवंगत गायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली जाणार आहे
Suman Kalyanpur
Suman KalyanpurPudhari
Published on
Updated on

पुणे: 'सुमन कल्याणपूर म्हणजे शब्दांना लाभलेले स्वरांचे सौंदर्य. संगीतकारांच्या मनातील प्रत्येक भावछटा, प्रत्येक सूक्ष्म बारकावे त्या आपल्या गायकीतून इतक्या नेमकेपणाने साकारत, की गाणे हे केवळ स्वरांचे न राहता भावविश्वाचा अनुभव बनत असे, अशी भावना प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांनी व्यक्त केली. सुमनताईंच्या स्वतंत्र अभिव्यक्तीमुळे आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या माधुर्यामुळे सुमनताईंचे स्थान भारतीय संगीतविश्वात सदैव अढळ राहील, असेही त्यांनी सांगितले. सुमनांजली कार्यक्रमात बासरीवादनातून सुमनताईंची गाणी सादर करीत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करणार असून, त्यांची गाणी सादर करण्यात खूप आनंद मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.

दिवंगत ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या समृद्ध सांगीतिक वारशाला आणि संगीतविश्वातील अमूल्य योगदानाला कृतज्ञ अभिवादन करण्याच्या भावनेतून दै. 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आणि पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे प्रस्तुत शुक्रवारी (दि. ३ जुलै) 'सुमनांजली' या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. भारती विद्यापीठ आणि अमित एंटरप्रायझेस हौसिंग लिमिटेड हे सहप्रायोजक आहेत. कार्यक्रमात अमर ओक आपल्या बासरीवादनातून सुमनताईंच्या अजरामर गीतांना स्वरांजली अर्पण करणार आहेत, तर काही निवडक गाणी ओक हे स्वतंत्ररीत्या सादर करणार आहेत. त्यांचे बासरीवादन हे कार्यक्रमातील आकर्षण असणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानेच दै. 'पुढारी'ने ओक यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सुमनताईंच्या गायकीचे विविध पैलू उलगडले.

ओक म्हणाले, “सुमनताईंच्या गाण्यांचा प्रभाव अतिशय वेगळा होता. त्यांच्या आवाजातील माधुर्य मनाच्या आतपर्यंत पोहचते. भावगीतांमध्ये त्यांनी भावविश्व उभे केले, भक्तिगीतांमध्ये भक्तिरस खुलवला आणि चित्रपटगीतांनाही त्यांनी आपली वेगळी ओळख दिली. ” ओक पुढे म्हणाले, "सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला अपेक्षित प्रमाणात मानवंदना मिळत नसल्याची खंत वाटते. अशा वेळी दै. 'पुढारी'ने पुढाकार घेऊन 'सुमनांजली'सारखा कार्यक्रम आयोजित केला, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. या उपक्रमासाठी मी 'पुढारी' परिवाराचे मनापासून आभार मानतो."

कार्यक्रम कधी आणि कुठे?

  • दिनांक : शुक्रवारी, ३ जुलै

  • वेळ : सायंकाळी ५ वाजता

  • स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे

दोन भेटी ; आयुष्यभराची शिदोरी

सुमनताईंना दोनवेळा भेटण्याचा योग आल्याची आठवण सांगताना ओक म्हणाले, “एका रिॲलिटी शोमध्ये त्या प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून आल्या होत्या. त्यांच्यासमोर मला बासरीवादन सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमानंतर त्यांनी माझ्या वादनाचे कौतुक केले. त्यांच्याकडून मिळालेली ती दाद माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा ठेवा आहे.”

संगीतकारांच्या विचारांना स्वररूप देणारी गायिका

सुमनताईंच्या गायकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य कोणते? असे विचारले असता ओक यांनी सांगितले की, “त्यांचा आवाज लतादीदींच्या आवाजाशी साधर्म्य साधणारा असल्याचे अनेकदा म्हटले जाते; मात्र, सुमनताईंची स्वतःची स्वतंत्र शैली आणि अभिव्यक्ती होती. विशेष म्हणजे संगीतकारांनी मनात उभी केलेली संकल्पना त्या अत्यंत नेमकेपणाने स्वरबद्ध करीत असत. संगीतकारांच्या अपेक्षा, भावछटा, सूक्ष्म बारकावे आणि गाण्याची अंतर्गत लय त्यांनी अचूक पकडली होती. “

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news