Wrestling Pudhari
पुणे

Maharashtra Kesari Referee Controversy: महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत पंच निवडीवरून वाद; बंदी उठविलेल्यांचा समावेश

परप्रांतीय पंचांनाही संधी; पारदर्शकतेवर प्रश्न, कुस्ती वर्तुळात चर्चा रंगली

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा वारसा आणि ‌‘महाराष्ट्र केसरी‌’चा बहुमान एका गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. आगामी राज्य कुस्ती स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेली पंचांची यादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पंचांच्या यादीमध्ये बाहेरील पंचाचा समावेश असून, त्यामध्ये बंदी घातलेल्या पंचाचाही समावेश असल्याने कुस्ती वर्तुळातून चर्चा रंगली आहे.

राज्यात 485 पंचांची फौज आणि दर वर्षी होणारी सातत्यपूर्ण शिबिरे असतानाही, दोन परप्रांतीय पंचांना पाचारण करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणात ज्या पंचांचा दबदबा होता, त्याच महाराष्ट्राच्या पंचांना आज डावलले जात असल्याने कुस्तीगीर संघाच्या धोरणांवर शंका उपस्थित होत आहे. ही स्पर्धा पारदर्शक होणार की पुन्हा एकदा निर्णयांच्या ‌‘कुस्ती‌’त खेळाडूंचा बळी जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

त्याचबरोबर गेल्या वर्षी अहिल्यानगर येथील स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये झालेल्या वादग््रास्त निर्णयांमुळे कुस्तीप्रेमींमध्ये प्रचंड संताप होता. विशेषतः शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या लढतीत मुख्य पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाची गंभीर दखल घेऊन चौकशी समितीने संबंधितांवर तीन वर्षांची बंदी घातली होती. मात्र, कोणत्याही ठोस कारणाशिवाय ही बंदी उठवून त्याच ‌‘डागाळलेल्या‌’ पंचांना पुन्हा मानाचे स्थान दिले गेल्याने नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

राज्यात 485 पंचांची फौज आणि दर वर्षी होणारी सातत्यपूर्ण शिबिरे असतात. आत्तापर्यंत 485 पंचांची शिबिरे फक्त नावापुरतीच होत आहेत का? एकेकाळी डझनवारी आंतरराष्ट्रीय पंच असलेल्या महाराष्ट्रात आज ही संख्या हाताच्या बोटावर उरली आहे. तांत्रिक सोयी-सुविधा असूनही निर्णय चुकत असतात. त्यातच संघटनांचा वाद अद्यापही न्यायालयात असल्याने या स्पर्धेबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पै. निकुंभ दत्तात्रय उभे, पुणे जिल्हा प्रवक्ता, कुस्ती मल्लविद्या महासंघ
राज्य कुस्तीगीर संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवराज राक्षे आणि पंचावर घातलेल्या बंदीबाबत चर्चा करून एकमताने दोघांचीही बंदी उठविण्यात आलेली आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्पर्धेत कोणतेही वाद नको यादृष्टीने कुस्ती महासंघाकडून महत्त्वाच्या कुस्ती लढतीसाठी महाराष्ट्राबाहेरील पाच मल्लांचा या यादीत समावेश केला आहे.
योगेश दोडके, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT