पुणे: राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागासाठी शुक्रवारी (दि. ३१) या शेवटच्या दिवसांपर्यंत सायंकाळी ५३ लाख ७४ हजार ३९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत शेतकरी सहभाग नोंदणीची एकूण संख्या ९३ लाख ८१ हजारांइतकी होती. याचा विचार करता ४० लाखांनी शेतकऱ्यांचा सहभाग घटला आहे.
दरम्यान, पीकविमा योजनेतील शेतकऱ्यांना सहभाग वाढण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे सीईओ, सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांना राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग यांनी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्याच्या कृषी विभागाच्या दि. ३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, महाराष्ट्रात २०२६-२७ या वर्षासाठी 'प्रधानमंत्री पीकविमा योजना' राबविली जात आहे.
मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीस विलंब झालेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीयरीत्या घटला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदणीची संख्या ९३.८१ लाखांइतकी होती. त्या तुलनेत या हंगामात ५३.७४ लाखांपर्यंत खाली आल्याच्या मुद्द्यांकडे प्रस्तावात विशेष लक्ष वेधण्यात आले आहे. या अडचणींचा विचार करून, योजनेसाठी नियुक्त केलेल्या सर्व पीकविमा कंपन्यांची संमती घेण्यात आली आहे. नोंदणीची अंतिम मुदत ही दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यास प्रत्येक कंपनीने औपचारिकपणे सहमती दर्शविली आहे.
त्यामुळे खरीप हंगामासाठी नोंदणीची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात यावी. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेतील सहभाग निश्चितपणे वाढून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत त्यांचे पिकांच्या नुकसानीच्या स्थितीत आर्थिक हित जपले जाईल, असेही त्यामध्ये म्हटले आहे. दरम्यान, १० ऑगस्टपर्यंत प्रस्तावानुसार केंद्राने विमा योजनेत सहभागास मुदतवाढ दिल्यास गतवर्षीइतकाच शेतकऱ्यांचा सहभाग निश्चित वाढेल, अशी अपेक्षा आहे. तसेच बँक कर्जदार शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणावर विमा सहभागाबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी दिली.
अर्ज आलेल्या जिल्ह्यांची माहिती
नांदेड - ८,४८,३५६. बीड - ६,१०,४६२. परभणी - ४,११,२०७. लातूर - ३,९५,१३०. धाराशिव - ३,१३,४७२. कोल्हापूर ४६९३. सांगली १,५३,२५८. अहिल्यानगर ३,०७,८२२. पुणे ४६,१३३. सातारा ५७,७१६. सोलापूर १,५८,२१७. छत्रपती संभाजीनगर २,५४,३९९. जालना २,४१,५२२.