Pune Flood: पुण्यात पुन्हा पुराचा कहर; एकतानगर पाण्याखाली, सोसायट्यांमध्ये कमरेएवढे पाणी

खडकवासला धरणातून ४३ हजार क्युसेक विसर्ग आणि नदीकाठचा बांध फुटल्याने संकट; अग्निशमन दलाकडून बोटीद्वारे नागरिकांची सुटका
Pune Flood
Pune FloodPudhari
Published on
Updated on

पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात केलेल्या ४३ हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे आणि प्रशासनाने नदीशेजारी उभारलेला मातीचा बांध अचानक तुटल्याने शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी साडेचारच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठचा बांध फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह थेट नागरी वस्तीत शिरला आणि बघता- बघता संपूर्ण परिसर पुन्‍हा एकदा पाण्याखाली गेला.

Pune Flood
Malin Landslide Tragedy: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे; पुनर्वसन झाले, पण जखमा अजूनही ताज्याच

या पुराचा सर्वाधिक फटका एकतानगर भागातील द्वारका, जलविहार, अभिलाषा, शारदा सरोवर, साई सिद्धार्थ, जलपूजन, श्यामसुंदर आणि कुदळे पाटील गार्डन या प्रमुख सोसायट्यांसह जवळपास दहाहून अधिक सोसायट्यांना बसला. या सर्व सोसायट्यांच्या आवारात आणि सखल भागातील घरांमध्ये कमरेएवढे पाणी साचले होते. पाण्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अडकून पडले. अचानक पाणी शिरल्याने उभ्या असलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

Pune Flood
India Defence Production: संरक्षण उत्पादन 1.76 लाख कोटींवर; स्फोटके निर्मितीत 150 हून अधिक कंपन्या परवाना प्रक्रियेत

सकाळच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात होती आणि पाणीपातळी कमी होती. मात्र, सायंकाळी चारनंतर पाण्याचा विसर्ग आणि फुगवटा वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ रबरी बोटींचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबविले. बोटींच्या साहाय्याने अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर आणण्यात आले.

Pune Flood
DRDO Military Explosives Seminar: डीआरडीओमध्ये लष्करी स्फोटके व सुरक्षेवर राष्ट्रीय मंथन; तंत्रज्ञान, सुरक्षा आणि अनुपालनावर भर

या घटनेमुळे घटनास्थळी पूर पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरवर्षी उद्‌भवणारी ही पूर परिस्थिती आणि प्रशासनाकडून होणाऱ्या वरवरच्या उपाययोजनांमुळे द्वारका, जलविहार आणि इतर सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराविषयी प्रचंड संताप आणि नाराजी पाहायला मिळत आहे.

Pune Flood
TET Exam | ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा!

धरणातून ४३ हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे आम्ही सकाळपासूनच एकतानगर परिसरात उपस्थित होतो. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत होते. मात्र, सकाळी पाण्याचा प्रभाव कमी असल्याने काही नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. सायंकाळी अचानक पाणी वाढल्याने आम्ही अग्निशमन दलाच्या बोटी मागवून तत्काळ बचावकार्य सुरू केले आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच, स्थानिक नागरिकांना राहण्यासाठी बॅडमिंटन हॉल येथे व्यवस्था केली आहे.

प्रज्ञा पोतदार-पवार, सहाय्यक आयुक्त, पुणे महापालिका

दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला या पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. सायंकाळी अचानक पाणी शिरल्यामुळे माझी स्वतःची दोन वाहने पाण्याखाली गेली असून, ती पूर्णपणे बंद पडली आहेत. प्रशासनाने फक्त आव्हाने करण्यापेक्षा आधीच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. दरवर्षी आम्ही मोठे नुकसान सहन करायचे का? प्रशासनाने आतातरी जागे होऊन या समस्येवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी आणि आमची या त्रासातून सुटका करावी.

माधव देशमुख, स्थानिक रहिवासी, एकतानगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news