

अशोक शेंगाळे
भीमाशंकर: माळीण दुर्घटनेनंतर शासनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ८.५० लाखांची मदत दिली. विविध योजनांतून आर्थिक साहाय्यही करण्यात आले. दुर्घटनेनंतर दोन महिन्यांत माळीण फाटा येथे तात्पुरत्या शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. कायमस्वरूपी पुनर्वसन एका वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र जागा निश्चित होण्यास विलंब झाल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली.
१ एप्रिल २०१७ रोजी नवीन गावठाणातील घरांचे लोकार्पण करण्यात आले. येथे ६८ घरे उभारण्यात आली असून, नागरी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दुर्घटनेतून बचावलेल्या १६ अंशतः बाधित कुटुंबांनाही नवीन गावठाणात घरे देण्यात आली. मात्र, २४ जून २०१७ रोजी झालेल्या पहिल्याच पावसात नव्या गावठाणातील अनेक त्रुटी समोर आल्या.
पुनर्वसनासाठी निवडलेली जागा डोंगर उतारावर असल्याने मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले होते. भरावाच्या ठिकाणी गॅबियन वॉल, दगडी पीचिंग, प्रीकास्ट गटारे, आरसीसी पाइप आणि रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यानंतर आवश्यक दुरुस्ती करण्यात आल्याने यंदाच्या पावसात जमीन खचणे किंवा पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
जुन्या माळीण येथे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १५१ ग्रामस्थांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मृतिस्तंभ परिसरात १५१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत ही झाडे मोठी झाली असून, परिसराचे स्मृतिवनात रूपांतर झाले आहे. अशा प्रत्येक झाडात आम्हाला आमची हरवलेली माणसे दिसतात, अशी हळवी भावना ग्रामस्थ व्यक्त करतात.
सध्या नवीन गावठाणातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय माळीण फाटा येथे इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
माळीण दुर्घटनेला बारा वर्षे झाली असली, तरी ग्रामस्थांच्या मनावरील वेदना, भीती आणि हरवलेल्या आप्तांची आठवण आजही तितकीच जिवंत आहे. पुनर्वसनाने निवारा मिळाला; मात्र त्या काळ्या दिवसाच्या आठवणी आजही प्रत्येक पावसात नव्याने जाग्या होतात.