CET  Pudhari
पुणे

Maharashtra CET Fee Hike: सीईटी नोंदणी शुल्कात 150 ते 250 रुपयांची वाढ? राज्य सीईटी कक्षाचा प्रस्ताव

अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, बी.एडसह 72 अभ्यासक्रमांसाठी 17 प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; वाढत्या खर्चामुळे शुल्कवाढ अपरिहार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) नोंदणी शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सीईटी कक्षाने तयार करून उच्च व तंत्रशिक्षण मंडळाकडे पाठवला आहे. शासन स्तरावरील मंजुरीनंतर यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रस्तावानुसार नोंदणी शुल्कात किमान 150 ते कमाल 250 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सीईटी कक्षामार्फत 19 प्रवेश परीक्षांद्वारे अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, बी.एड, हॉटेल मॅनेजमेंट अशा 72 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. काही परीक्षा प्रत्यक्ष लेखी स्वरूपात, तर काही संगणकीय पद्धतीने राज्यभरातील विविध केंद्रांवर घेतल्या जातात. 2026-27 शैक्षणिक वर्षातील सीईटीची सुरुवात 24 मार्चपासून एमपी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होणार आहे. तर यानंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठी एमएच-सीईटीच्या पीसीएम गटाची पहिली परीक्षा 11 ते 19 एप्रिल, तर पीसीबी गटाची पहिली परीक्षा 21 ते 26 एप्रिल या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या अतिरिक्त संधीअंतर्गत पीसीएमच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा 14 ते 17 मे, तर पीसीबीच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा 10 आणि 11 मे रोजी आयोजित केल्या जाणार आहेत.

आगामी शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या 17 प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या 12 प्रवेश परीक्षा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5 प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. सध्या लेखी परीक्षांसाठीचे नोंदणी शुल्क 500 ते 600 रुपये असून, संगणकीय परीक्षांसाठी 800 ते 1000 रुपये आकारले जात आहे.

परीक्षा केंद्रांच्या सुविधा, मनुष्यबळ, संगणकीय प्रणाली, तसेच राज्यभर उभारण्यात येणाऱ्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शुल्कवाढ आवश्यक झाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सीईटी परीक्षा निर्दोष आणि कोणताही अडथळा न येऊ देता पार पाडणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांवर अनाठायी भार न पडता व्यवस्थेचा खर्च भागवण्यासाठी मर्यादित वाढ करत जास्तीत जास्त 250 रुपये प्रस्तावित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अंतिम निर्णयानंतर पुढील शैक्षणिक वर्षात राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सुधारित शुल्क भरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT