SSC HSC Board Pudhari
पुणे

Maharashtra Board Online Question Papers: दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका आता ऑनलाइन; राज्य मंडळाचा मोठा डिजिटल निर्णय

पुढील वर्षापासून परीक्षा केंद्रांवर ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका; सीएसआरमधून विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याचाही उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावी-बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यासाठी आवश्यक संगणक, प्रिंटर, सॉफ्टवेअर, वायफाय आणि अन्य डिजिटल सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात सोमवारी राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संयुक्त सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. या नव्या व्यवस्थेनुसार परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतील. केंद्रांवर त्यांची मुद्रित प्रत काढून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वितरण केले जाईल.

‌‘शिक्षण संक्रमण‌’ मासिक पूर्णपणे डिजिटल

‌‘शिक्षण संक्रमण‌’ हे राज्य मंडळाचे मासिक पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे छपाई आणि टपाल खर्चात बचत होणार असून, अधिकाधिक शिक्षकांपर्यंत हे मासिक पोहचण्यास मदत होणार आहे.

सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शुल्क भरणार

राज्यातील उद्योग आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आणि मुलींचे परीक्षा शुल्क भरण्याचा उपक्रम राबविण्याची माहितीही डॉ. कुलकर्णी यांनी दिली. महासंघाने या निर्णयांचे स्वागत करीत राज्य मंडळाचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT