Teacher Pudhari
पुणे

Maharashtra Idol Teachers List: महाराष्ट्रात ४ हजार ४८४ आयडॉल शिक्षकांची निवड; पुणे जिल्हा ४८७ शिक्षकांसह अव्वल

विद्या प्राधिकरणाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी यादी जाहीर; उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण, कार्यशाळा आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ४ हजार ४८४ आयडॉल शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, शिक्षणक्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि प्रभावी कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरावर प्रत्येकी दहा या प्रमाणे एकूण ४४२ आयडॉल शिक्षकांची निवड झाली होती. यावेळी मात्र ही संख्या ४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. यामुळे आयडॉल शिक्षकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या शिक्षकांना राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित प्रशिक्षण, कार्यशाळा तसेच चर्चासत्रांमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.

आवश्यकतेनुसार त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही नियुक्त केले जाईल, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ संपूर्ण शिक्षण विभागाला होईल. यादीत सर्वाधिक शिक्षक पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातून ४८७ शिक्षकांची निवड झाली आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये २६०, नाशिकमध्ये २४५, अहिल्यानगरमध्ये २३७ आणि सातारामध्ये २२६ शिक्षकांचा समावेश आहे.

याउलट गडचिरोलीत ४९, गोंदियात ४६, भंडाऱ्यात ३५, नंदुरबारमध्ये २५, परभणीत १७ आणि वाशिममध्ये केवळ १६ शिक्षकांची निवड झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांचाही या यादीत समावेश आहे.

आयडॉल शिक्षक उपक्रमाचा उद्देश केवळ सन्मान करणे इतका मर्यादित नाही. उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा प्रसार करणे, इतर शिक्षकांना प्रेरणा देणे आणि राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा स्तर उंचावणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. निवडलेल्या शिक्षकांचे अनुभव आणि कौशल्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला उपयुक्त ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT