

पुणे: दिवाळीचा सण प्रदूषणमुक्त साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सु मोटो’ जनहित याचिका क्रमांक १/२०२६ मध्ये दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी आणि पर्यावरणीय प्रदूषणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांच्या दि. २२ ऑक्टोबरच्या पत्रानंतर शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिकांच्या शिक्षण विभागांना उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
शाळांमधील नियमित परिपाठाच्या वेळेचा उपयोग करून विद्यार्थ्यांना ही शपथ देता येणार आहे. फटाक्यांमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषण होते. त्याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच पशुपक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून यंदाच्या दिवाळीत फटाके न वाजविण्याचा संकल्प करून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न वाजवण्याबरोबरच मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबीयांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे, असे शपथेत नमूद केले आहे.
वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचाही या शपथेत समावेश आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक आणि संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या निदर्शनास शासनाच्या सूचना आणून द्याव्यात, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.