Death Pudhari
पुणे

Lonikand Stone Crusher Accident: लोणीकंदमध्ये स्टोन क्रशरमध्ये अडकून १७ वर्षीय कामगाराचा मृत्यू

अल्पवयीन मुलाकडून धोकादायक काम करून घेतल्याचा आरोप; साईराम स्टोन क्रशरच्या तीन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्टोन क्रशरमध्ये (खडी मशिन) अडकून १७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. अल्पवयीन मुलाला कामावर ठेवून त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करून घेणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी साईराम स्टोन क्रशरच्या तीन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय १७) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अजित कुऱ्हे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ठेकेदार दिलीप संभाजी शिळीमकर (वय ४०, रा. वाघोली), सत्यजित अशोक जाना (वय ३५, रा. वाघोली) आणि अमित भगवान अकोलकर (रा. रावेत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स धुर्वे हा मूळचा मध्य प्रदेशातील बिजोरीगाव, करंजिया, दिंडोरी येथील रहिवासी होता. तो मागील दोन महिन्यांपासून लोणीकंद येथील साईराम स्टोन क्रशरमध्ये काम करीत होता. प्रिन्स हा अल्पवयीन असतानाही त्याच्याकडून धोकादायक स्वरूपाचे काम करून घेतले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

उपचारापूर्वीच मृत्यू

दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास स्टोन क्रशर मशिनमध्ये अडकून प्रिन्स गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

चौकशीत प्रिन्सला कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाविषयक साधने पुरवली नसल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलाला कामावर ठेवणे, त्याच्याकडून धोकादायक काम करून घेणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने झालेल्या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी तिघा ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विलास मोटे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT