Leopard  Pudhari
पुणे

Leopard Sightings: सिंहगड-पानशेत परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; वारुळवाडीत बिबट मादी जेरबंद

जगताप माची, पोळे गावाजवळ रस्त्यावर बिबट्याचे दर्शन; पर्यटकांना सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत वनक्षेत्रात प्रवेशबंदी

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: सिंहगड-पानशेतसह राजगड-तोरणा परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळनंतर मुख्य रस्त्यांवर बिबटे ठाण मांडून बसत असून, शेतशिवारासह नागरी वस्त्यांमध्येही त्यांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांसह नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

शनिवारी (दि. ३१) सायंकाळी ७ वाजता गणेश माताळे आणि तुषार भामे हे खेड शिवापूर येथून सिंहगड घाट-डोणजे मार्गाने गोऱ्हे खुर्द येथे कारमधून जात होते. जगताप माचीजवळ अचानक एक धष्टपुष्ट नर बिबट्या रस्त्याच्या मधोमध येऊन उभा राहिला. बिबट्याला पाहताच दोघेही घाबरले. त्यांनी कारच्या काचा बंद करून त्याच्याकडे पाहिले; मात्र बिबट्या जागेवरून हलला नाही. त्यानंतर गणेश यांनी कारचे मुख्य दिवे सुरू केले. प्रकाशामुळे बिबट्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी कठड्यावर जाऊन उभा राहिला. या वेळी गणेश यांनी मोबाईलमध्ये त्याचे छायाचित्र टिपले आणि दोघेही तेथून घरी रवाना झाले.

असाच प्रकार पानशेत धरण खोऱ्यातील पोळे गावाजवळ घडला. पुणे-पानशेत मार्गावरील टेकपोळे एसटी बस रात्री साडेसात वाजता टेकपोळेकडे जात असताना रस्त्यावर अचानक बिबट्या आला. बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या घाबरून जंगलात पळून गेला. सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यासह परिसरातील वनक्षेत्रात बिबट्यांचे वास्तव्य आहे. तळई वन उद्यान, जगताप माची आदी भागांत सायंकाळनंतर बिबट्यांचा वावर असतो. त्यामुळे सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत सिंहगड किल्ल्यासह परिसरातील वनक्षेत्रात पर्यटक आणि नागरिकांना जाण्यास मनाई आहे, असे सिंहगड वन विभागाच्या वन परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे यांनी सांगितले.

वारुळवाडीत बिबट मादी जेरबंद

वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील चिमणवाडी परिसरात प्रशांत वारुळे यांच्या द्राक्षबागेत वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवार (दि. १) रोजी पहाटे बिबट मादी जेरबंद झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.चिमणवाडी या ठिकाणी १८ सप्टेंबर रोजी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, अनेकवेळा बिबट्या पिंजऱ्याभोवती येऊनही पकडण्यापासून हुलकावणी देत होता, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी पहाटे बिबट मादी पिंजऱ्यात अडकली. अंदाजे एक ते दीड वर्षे वयाची ही मादी आहे. स्थानिक नागरिक, आपदामित्र सुशांत भुजबळ, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, अतुल कानडे, संदीप वारुळे तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे, प्रयाग पवार, गणेश घुमटकर आणि संतोष संते यांच्या मदतीने तिला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

दरम्यान, वाळूवाडी परिसरामध्ये अद्यापही दोन बिबट्यांचा वावर असून, वन विभागाने त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. गुजरवाडी येथील बेलोटा मळ्यामध्ये देखील ८ दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे, परंतु तो देखील बिबट्या पिंजऱ्यात आलेला नाही. याशिवाय सावरगावच्या हिंगेमळा येथे देखील पिंजरा असून, १५ दिवस उलटले. मात्र, बिबट्या पिंजऱ्यामध्ये येत नाही. त्यामुळे वन विभागाने या बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक प्रभावी योजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT