पुणेः लोहगाव विमानतळावरील स्थानिक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी पहाटे पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. विमानतळावर नवे पाच ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे आता तेथे एकूण 8 कॅमेरे अन तीन पिंजरे झाले आहेत.
लोहगाव विमानतळावर बिबट्या अनेक दिवसांपासून लपला आहे. तो अधूनमधून लोकांना दिसतो. त्यामुळे तेथे तीन ट्रॅप कॅमेरे लावले होते, मात्र मंगळवारी पहाटे पुन्हा विमानतळ कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसला, त्यामुळे तेथे तातडीने पाच ट्रॅप कॅमेरे नव्याने बसविण्यात आले .तसेच तीन पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत. पुणे वन परिक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी, रेस्क्यू संघटनेचे सदस्य,भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण कारवाई करण्यात आली.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात अलीकडेच बिबट्या निर्दशनास आल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ सावधगिरीच्या उपाययोजना सुरू करत विद्यार्थ्यांना रहिवाशांना तसेच अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाच्या जयकर ग््रांथालय येथील सभागृहात बिबट्या संदर्भातील जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दुपारी 3.15 ते 4.15 या वेळेत पार पडली.
कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी कृष्णा हाके व रेस्क्यू टीमचे किरण राहीलकर यांनी बिबट्यांच्या हालचाली, त्यांच्या वर्तनातील वैशिष्ट्ये, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, परिसरात फिरताना घ्यायची सुरक्षा उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जयकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. देसले, विद्यापीठातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच अनुषंगाने आज बुधवार (दि.26) विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र जनजागृती कार्यशाळा होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी वन विभाग आणि सुरक्षा विभागाचे दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा वावर असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वन विभागाशी संपर्क साधून आवाहन करणारे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी बाहेर पडणे टाळा. समाजमाध्यमांवरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले यांनी केले आहे.
विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा वावर असल्यासंदर्भात अफवा पसरली होती. त्यावर वन विभागाशी संपर्क साधून या माहितीची सत्यता तपासली असता सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडीओ हा औंध परिसरातील सिंध कॉलनी भागातील असल्याची माहिती मिळाली. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा वावर दिसल्यास तत्काळ वन विभाग व विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. वन विभागाशी संपर्क साधण्यासाठी 1926 या क्रमांकावर तर सुरक्षा विभागाशी संपर्क साधण्यासाठी 020- 48553383 किंवा 020-25621000 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. बिबट्याबाबत वन विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त झाल्यास त्याबाबत त्वरित अवगत करण्यात येईल, त्यामुळे समाजमाध्यमांवरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
बिबट्यांच्या वावरासंदर्भात व्हिडीओ, फोटो यांची अधिकृत माहिती प्राप्त झाल्याशिवाय अथवा सत्यता पडताळणी केल्याशिवाय सोशल मीडियावर कोणीही पोस्ट करू नये. स्टेटसला ठेवू नये अथवा ग््रुापवर माहिती टाकू नये. तसेच सोशल मीडियावर भीतीदायक वातावरण निर्माण होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले असून, त्याचे सर्वांनी पालन करावे.