

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे दुचाकीच्या किरकोळ अपघातावरून निर्माण झालेल्या वादातून चौघांनी कोयता व हॉकीने दहशत माजवत युवकासह त्याच्या आई व मामाच्या मुलाला मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोन्या ऊर्फ सूरज देंडगे (रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर) उमेश गंडले व क्रिश गायकवाड (दोघे रा. डोंगरवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर) व दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही. रा. शिक्रापूर ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय राजेंद्र लष्करे (वय १९, रा. सणसवाडी, ता. शिरूर) याने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडीतील विजय लष्करे यांच्या दुचाकीला उमेश गंडले यांच्या दुचाकीचा धक्का लागून नुकसान झाले होते. याबाबत विजय यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असता उमेश यांनी ती नाकारत दमदाटी केली.
सायंकाळच्या सुमारास विजय घरासमोर उभे असताना सूरज देंडगे, उमेश गंडले, क्रिश गायकवाड आणि आणखी एक युवक दोन दुचाकींवरून आले. त्यांनी कोयता आणि हॉकी दाखवत शिवीगाळ व धमकी देत विजय यांना मारहाण केली.
मध्ये येणाऱ्या विजय यांच्या आईला तसेच मामाच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नसल्याची धमकीही आरोपींनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार करीत आहेत.