

पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अवघ्या आठ दिवसांवर आल्या आहेत. राज्यभरात मतदार याद्यांमधील दुबार मतदारांच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार वा तिबार नावे असलेल्या मतदारांकडून हमीपत्र घेतले जाणार असून, त्यांनी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागणार आहे.
या दुबार-तिबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष हमीपत्र घेणार आहेत. या हमीपत्रात संबंधित मतदाराने एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे नमूद करावे लागणार आहे. जर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केल्याचे आढळल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील.
निवडणूक आयोगाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित विधानसभा मतदार यादीचा आधार घेतला जातो. नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या जातात. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामध्ये मतदारांची नावे समाविष्ट करताना दुबार आणि तिबार नावे आपोआप तपासली जातात व यादीत चिन्हांकित केली जातात. संभाव्य दुबार आणि तिबार मतदारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला या संकेतस्थळासाठी स्वतंत्र आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्याद्वारे संबंधित प्रभागातील किती मतदारांची नावे दुबार किंवा तिबार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
17 हजारांपेक्षा जास्त दुबार मतदार
पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्यात सहा लाख 34 हजार मतदार आहेत. त्यातील तब्बल 17 हजार 744 मतदारांची नावे दुबार किंवा तिबार असल्याचे स्पष्ट झाले आहे.