आबाजी पोखरकर
पिंपरखेड: जंगलातील बिबट्यांनी शेतांमध्ये अतिक्रमण केले असून, बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक अर्थकारणावर होताना दिसत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करत आहेत, मात्र ऊस पिकांमध्ये बिबट्याची वाढती दहशत शेतीस मोठा फटका पोहचवत आहे.
परिसरात पाण्याची चांगली सोय असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. उसाच्या घनदाट पिकामुळे बिबट्यांना सुरक्षित लपण्याची जागा मिळत असून, त्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, शेतकरी उसाशेजारी इतर आर्थिकदृष्ट्या लाभदायक पिके घेऊ इच्छित असतानाही, बिबट्यांच्या सततच्या वावर आणि हल्ल्याच्या भीतीमुळे ते घेऊ शकत नाहीत, ज्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत आहे.
बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतीत काम करण्यासाठी मजूरही मिळत नाहीत. विशेषतः महिला मजूर बिबट्यांच्या हल्ल्याच्या भीतीने शेतीत जाण्यास घाबरतात, जरी त्यांना जास्त मोबदला दिला जात असला तरीही, महिला मजूर कामासाठी तयार होत नाहीत. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असून, पिंपरखेड येथील बिबट्यांच्या हल्ल्यामुळे बाहेरून येणाऱ्या ऊसतोड टोळ्या इकडे येण्यास कचरत आहेत. परिणामी, ऊसतोडणीचे काम संथ गतीने सुरू आहे, ज्यामुळे कारखान्यांना वेळेवर ऊस पोहोचवण्याच्या नियोजनावर ताण येत आहे.
रब्बी हंगामातील कांदा पिकाचे नियोजन धोक्यात
बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे केवळ ऊसतोडणीच नाही, तर आगामी रब्बी हंगामातील कांदा पिकांचे नियोजन देखील कोलमडण्याची चिन्हे आहेत. कांदा हा रब्बी हंगामातील महत्त्वाचे पिक असून, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी आणि मजूर शेतात काम करण्यास उपलब्ध नसल्यास, कांद्याची लागवड, खुरपणी आणि काढणी यावर थेट परिणाम होणार आहे.
दूरगामी परिणाम होण्याची शक्यता
बिबट्याच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आणि शेतकरी व मजुरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी वनविभागाने तातडीने कठोर उपाययोजना करावी. या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास भविष्यात शेती व्यवसाय आणि परिसरातील अर्थकारण दोन्हीवर गंभीर व दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.