Junnar Leopard Captured Pudhari
पुणे

Junnar Leopard: जुन्नरच्या शिरोलीत बिबट्याची मादी जेरबंद; परिसरात आणखी दोन बिबट्यांचा वावर

चिक्कूच्या बागेतील पिंजऱ्यात चार वर्षांची मादी अडकली; शेतकरी आणि नागरिकांकडून आणखी पिंजरा लावण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील देवराम थोरवे यांच्या चिक्कूच्या बागेत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २२) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. जेरबंद झालेल्या बिबट्याच्या मादीचे वय अंदाजे चार वर्षे असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या परिसरामध्ये अद्यापही दोन बिबटे असून स्थानिक नागरिकांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे अशी माहिती जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ, वनकर्मचारी राजेंद्र सोनवणे तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने जेरबंद झालेल्या बिबट्याच्या मादीला सुरक्षितपणे माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.

दरम्यान, या परिसरात आणखी दोन बिबटे असल्याची प्राथमिक माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी तातडीने आणखी एक पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. उर्वरित बिबट्यांनाही लवकरच जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी नागरिकांना दिले.

सध्या परिसरात ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्यांचा एका उसाच्या शेतातून दुसऱ्या शेतात वावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, ऊसतोड कामगार आणि नागरिकांनी शेतात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जुन्नर वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव पुन्हा वाढू लागला असून अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. पिंपळगाव तर्फे नारायणगाव या ठिकाणी शिवाजी लक्ष्मण वाणी यांचे पाळीव कुत्रे दोन दिवसांपूर्वी बिबट्याने फस्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT