खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यालगतच्या पानशेत धरण खोऱ्यासह तोरणागडाच्या परिसरात बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. चांदरमध्ये बुधवारी (दि. 5) दुपारी बिबट्याने सविता रामभाऊ ढेबे यांच्या तीन शेळ्यांचा फडशा पाडला. या परिसरात दहा ते पंधरा बिबटे आहेत. तसेच, त्यांच्या सोबत चार-पाच बछडे असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. (Latest Pune News)
बिबट्यांचा उपद्रव व त्यांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांसह या परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात कशेडी तसेच त्या आधी माझगाव, भोर्डी, पोळे, माणगाव आदी ठिकाणी बिबट्यांनी दहा शेळ्या, वासरांचा फडशा पाडला.
सध्या या परिसरात भात, नाचणी, वरई पिकांची कापणी सुरू आहे. ऐन कापणीच्या हंगामात बिबट्यांचा हैदोस वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. रानात जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाणे धोक्याचे झाले आहे. तसेच, शेतात पिकांची कापणी करणेही धोकादायक झाले आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यालगतच्या राजगड तालुक्यातील पानशेत, घिसर, तोरणा, पासली, केळद, अठरा गाव मावळ परिसरातील घनदाट जंगलात पावसामुळे गर्द झाडे-झुडपे, गवत वाढले आहे. त्यामुळे बिबटे झुडपात दबा धरून बसत आहेत.
रानात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या, मेंढ्या, वासरे अशा लहान जनावरांवर हल्ला करून त्यांचा जागीच फडशा पाडत आहेत. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे गुराख्यांसह शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. राजगड वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी मंजूषा घुगे, वनरक्षक सुनील होलगिर, निखिल रासकर यांच्या पथकाने बिबट्यांचा वावर असलेल्या खाणू, चांदर परिसराची पाहणी केली.
गस्त, जनजागृती सुरू
राजगड वन परिक्षेत्र अधिकारी सुनील लांगडे यांच्या देखरेखीखाली परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक राजेंद्र निबोंरे, स्वप्निल उंबरकर आदींच्या पथकाने बिबट्यांचा हैदोस सुरू असलेल्या परिसरात गस्त तसेच जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे वैशाली हाडवळे यांनी सांगितले.
बिबट्यांचा वावर वाढला
पानशेत, तोरणासह राजगड तालुक्यात वन विभागाचे दहा हजारांहून अधिक हेक्टरवर वन क्षेत्र आहे. सर्वात अधिक वन क्षेत्र रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्याच्या परिसरात आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांत या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. आठ ते दहा बिबटे या परिसरात आहेत.
खाणू येथील सविता ढेबे यांच्या शेळ्या शेजारच्या चांदर गावच्या हद्दीत चरत असताना बिबट्याने ठार मारल्या आहेत. या बाबत त्यांनी अर्ज दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना वन विभागाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.मंजूषा घुगे, वनपरिमंडल अधिकारी