

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याचा कार्यक्रम आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केला आहे. ही सोडत 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडणार आहे. या सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Latest Pune News)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यंदा 42 प्रभाग असून 41 प्रभागात चार तर प्रभाग 38 मध्ये पाच सदस्यीय आहेत. तब्बल 165 नगरसेवकांना निवडून द्यावे लागणार आहे. सध्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची आखणी, मतदान यंत्र (ईव्हीएम) वापरण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, निकाल प्रक्रिया आदी विषयांवर कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देणे सुरू आहे.
मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमदेखील जाहीर झाला आहे. दरम्यान, प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सोडतीच्या कार्यक्रमाची तयारी प्रशासनाने केली आहे. सकाळी 11 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या आरक्षणाच्या प्रारूप याद्या 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना 17 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत (दुपारी 3 वाजेपर्यंत) स्वीकारल्या जाणार आहेत. या हरकती व सूचना महानगरपालिका मुख्यालया तील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्याल यात प्रत्यक्ष सादर कराव्या लागतील.