पुणे: ‘सध्या लावणीच्या नावाखाली किंवा डीजे नृत्य, रंगमंच सादरीकरणाच्या नावाने अश्लील सादरीकरणे होत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे लावणी कलाकार आणि लोककलाकारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्धार कलाकारांनी रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग््रेास चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले होते.
ज्येष्ठ कलाकार लावणी मंगला बनसोडे, बरखा जळगावकर, अप्सरा जळगावकर, राजश्री काळे, वनमाला बागूल, संगीत बारी (कला केंद्र) असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे प्रदेश सचिव मोहित नारायणगावकर, अखिल महाराष्ट्र लोककलावंत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नारायण जावळेकर, शिवाजी जावळेकर उपस्थित होते.
मंगला बनसोडे म्हणाल्या, मध्यंतरी डीजेच्या तालावर नृत्य सुरू झाले. त्याचा परिणाम पारंपरिक लोककलेवर होत आहे. राज्य सरकारने सेन्सॉर बोर्ड स्थापन करून पारंपरिक लोककलेला नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी. तर आता व्यावसायिक
स्पर्धेतून लावणीचे मूळ स्वरूप बदलताना दिसत आहे. आधुनिकतेला विरोध नाही, पण परंपरेचा आत्मा जपला गेला पाहिजे, असे बरखा आणि अप्सरा जळगावकर म्हणाल्या.