Kurkumbh Pharma Incident Investigation Pudhari
पुणे

Kurkumbh Pharma Incident: कुरकुंभच्या त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सलग दोन दिवस पाहणी

रिअॅक्टरमधील दाब वाढल्याने प्रेशर डिस्क फुटल्याचा कंपनीचा दावा; आग लागली नसल्याचे स्पष्टीकरण, पाहणीच्या निष्कर्षांकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पांढरेवाडी: दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटसदृश घटनेने औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी (दि. २७) नोव्हेंबर रात्री ९ वाजता सहाय्यक संचालक विष्णू सांगोलकर यांनी कंपनीला भेट दिली.

त्यानंतर शनिवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी सहसंचालक सुधीर शिंदे आणि सहाय्यक संचालक विष्णू सांगोलकर यांनी पुन्हा घटनास्थळी पाहणी केली. दुसरीकडे कंपनीचे संचालक संदीप जामदार यांनी घटनेबाबत स्पष्टीकरण देत रिॲक्टरमधील दाब वाढल्याने ही घटना घडल्याचे सांगितले. कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्माकंपनीत गुरुवारी (दि. २६) सकाळी झालेल्या घटनेनंतर परिसरात धुराचे लोट दिसून आले होते. त्यामुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्था, रिअॅक्टरची कार्यप्रणाली आणि घटनेचे नेमके कारण याबाबत प्रश्न उपस्थित झाले.

या पार्श्वभूमीवर संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सलग दोन दिवस झालेल्या या पाहणीमुळे औद्योगिक वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. याबाबत त्रिमूर्ती फार्माकंपनीचे संचालक संदीप जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंपनीतील रिअॅक्टर क्रमांक एकमध्ये एनबीए (NBA) मिश्रणाची डिस्टिलेशन प्रक्रिया पूर्ण झाली.

त्यानंतर रिअॅक्टरमधील दाब वाढला. परिणामी रिअॅक्टरमधील प्रेशर डिस्क फुटून दाब बाहेर पडला. त्यानंतर रिअॅक्टरच्या जॅकेटमधील वाफेचा व्हॉल्व्ह सोडण्यात आला. या प्रक्रियेदरम्यान रिअॅक्टरमधून बाहेर पडलेले उत्सर्जन आणि जॅकेटमधून सोडलेली वाफ सुमारे १० मिनिटे दिसत होती. वाफेचा मोठा लोट धुरासारखा दिसल्याने परिसरात आग लागल्यासारखे दृश्य निर्माण झाले होते मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची आग लागली नव्हती, असे जामदार यांनी स्पष्ट केले.

दुखापत, जीवितहानीही नाही : कंपनीचा दावा

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून जीवितहानीही झाली नसल्याचे संदीप जामदार यांनी सांगितले. कंपनीच्या प्रचलित सुरक्षा कार्यपद्धतीनुसार आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाहणीचे निष्कर्ष काय?

कंपनीकडून घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. कंपनीने मांडलेली बाजू आणि घटनास्थळी नोंदविण्यात आलेल्या बाबींची पडताळणी झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT